
सामना ऑनलाईन । कोलकाता
घोड्यावरून नाचत गाजत आपला नवरा वरात घेऊन यावा असे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. हल्लीचे तरुण देखील त्यांची लग्नातील एन्ट्री अविस्मरणीय करण्यासाठी हटके आयडिया आजमवतात. स्पोर्ट्स बाईक, लक्झरी कारमधून आलेले नवरदेव आपण बघितले असतील पण पश्चिम बंगालमध्ये एक नवरदेव चक्क रोड रोलरवरून त्याच्या लग्नमंडपात दाखल झाला. त्या नवरदेवाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अरका पात्रा असे त्या नवरदेवाचे नाव असून तो एका सजवलेल्या रोड रोलवरून लग्न मंडपात आल्याने नवरीकडच्या नातेवाईकांना आश्चर्याचा धक्काच बसला. मात्र अरकाच्या या हटके आयडियाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. ‘मला माझा लग्नसोहळा सर्वांपेक्षा हटके आणि अविस्मरणीय करायचा होता. मी विंटेज कार किंवा लक्झरी कार देखील घेऊन येऊ शकलो असतो मात्र आता त्यात काही नाविन्य उरलेले नाही. जेसीबीमधून एका नवरा नवरीची वरात काढल्याचे देखील ऐकले होते. मात्र रोड रोलरवरून कुणी लग्नाला गेल्याचे माझ्या ऐकीवात नव्हते. त्यामुळे मी हा निर्णय घेतला. माझी होणारी बायको अरुंधती तरफदार हिला देखील माझी ही कल्पना आवडली. तसेच आम्ही लग्नात आम्ही लाऊड स्पीकरचा वापरही टाळलेला आहे. त्या ऐवजी एक बासरी वादक मधूर आवाजात बासरी वाजवत हॉलभर फिरत होता. आमचे रिसेप्शन देखील इको फ्रेंडली असणार आहे’, असे अरका याने प्रसारमाध्यमांना सांगितले.



























































