
गेल्या सहा वर्षांत विकासात प्रचंड घट झाल्याने बेरोजगारीतही मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे एनडीएत संतापाची लाट पसरली असून एनडीएतील घटक पक्षांनी भाजप सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. अर्थव्यवस्था इतक्या रसातळाला का गेली? याप्रकरणी सरकारने ठोस पाऊल का उचलले नाही, असे सवाल जनता दल युनायटेड आणि अकाली दल या घटक पक्षांनी केले आहेत.
अर्थव्यवस्था रसातळाला गेली असून विकासदर वाढवण्यात सरकार असमर्थ ठरले आहे. तसेच नेतेमंडळी आणि अर्थतज्ञांची एक बैठक बोलवा अशी मागणीही घटक पक्षांनी केली आहे. औद्योगिक उत्पादन घटल्याबद्दल शिरोमणी अकाली दलाचे नेते नरेश गुजराला यांनी चिंता व्यक्त केली आहे. ढासळत चाललेल्या अर्थव्यवस्थेप्रकरणी सरकारने अद्याप घटक पक्षांबरोबर एकही बैठक घेतलेली नाही याबद्दल एनडीएत प्रचंड नाराजी आहे. दरम्यान, माजी पंतप्रथान मनमोहन सिंग यांच्याबरोबर घसरत्या विकासदराबाबत चर्चा होणे गरजेचे असल्याचेही घटक पक्षांनी म्हटले आहे. ते विरोधक असले तरीही त्यांचा सल्ला महत्त्वाचा होता. सरकारी कंपन्यांचे खासगीकरण हा अर्थव्यवस्था सावरण्यावर उपाय नसून सरकारचा हा प्रयत्न फसल्याचे मतही घटक पक्षांनी व्यक्त केले आहे.
घटक पक्षांची एनडीएबाहेर पडण्याची तयारी
एनडीएतील सर्वात जुना घटक पक्ष शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आहे. आता इतर घटक पक्षही एनडीएतून बाहेर पडण्याची तयार करत असल्याचे समजते. सरकारी कंपन्यांचे खासगीकरण हा चिंतेचा विषय असल्याचे जेडीयूचे नेते त्यागी म्हणाले. अर्थतज्ञांनी तसेच रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर यांनी अर्थव्यवस्थेबद्दल इशाराही दिला होता, परंतु सरकारने हा इशारा गांभीर्याने घेतला नाही, असेही त्यागी म्हणाले.
























































