
सामना ऑनलाईन। अहमदाबाद
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर धमाल उडवणाऱ्या एका खेळणी विक्रेत्याला गुजरात रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. रेल्वेत एका खास स्टाईलमध्ये खेळणी विकणाऱ्या या तरुणाचे नाव अविनाश दुबे असून तो मूळचा वाराणसीचा रहीवासी आहे. गुजरातमध्ये तो ट्रेनमध्ये राजकारणी मंडळीची मिमिक्री करत खेळणी विकायचा. पण बेकायदेशीरपणे रेल्वेत प्रवेश करणे, वस्तू विकणे ,गोंधळ घालणे, वादग्रस्त वक्तव्य करणे या आरोपाखाली त्याला सूरत येथे अटक करण्यात आली आहे.
दुबे गुजरातमधील रेल्वेत खेळणी विकायचा. पण खेळणी विकताना तो काही राजकारणी नेत्यांची मिमिक्रीही करायचा. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच मनोरंजन व्हायचे व दुबेची खेळणीही विकत घ्यायचे. यामुळे दुबे लोकप्रिय झाला. त्यातच काही दिवसांपूर्वी दुबेचा मिमिक्रीचा व्हिडीओ एका प्रवाशाने सोशल साईटवर टाकला आणि तो हीट झाला. पण दुबेच्या मिमिक्रीवर रेल्वे पोलिसांनी आक्षेप घेत त्याला अटक केली आहे.


























































