इंग्लंडसोबतची T20 मालिका रद्द करा नाहीतर आत्महत्या करेन, त्रस्त नागरिकाची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमधील अहमदाबाद येथे हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात T20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. इथल्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर हे सामने खेळवले जात आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान असलेल्या या स्टेडियममध्ये कोरोनाचा वाढता फैलाव पाहता फक्त 50 टक्के प्रेक्षकांनाच परवानगी देण्यात आली आहे. देशातील काही शहरांप्रमाणेच अहमदाबादमध्येही कोरोनाचा फैलाव पुन्हा वेगाने व्हायला लागला आहे. देशाला पुन्हा चिंतेत टाकणारी ही परिस्थिती निर्माण झाल्याने अहमदाबादमधली क्रिकेट मालिका रद्द करा अशी मागणी गुजरातमधल्याच एका नागरिकाने केली आहे. ही मागणी मान्य झाली नाही तर स्वत:ला पेटवून देत आत्महत्या करेन अशी धमकीही या नागरिकाने दिली आहे.

अहमदाबादमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ व्हायला लागली आहे. असं असतानाही या शहरात क्रिकेटचे सामने खेळवले जात आहेत. ही गोष्ट खटकल्याने पंकज पटेल नावाच्या व्यक्तीने पोलिसांना फोन केला. त्याने 12 मार्च रोजी हा फोन केला होता. या सामन्यांसाठीच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस निरीक्षक केव्ही पटेल यांच्याकडे आहे. पंकजने थेट त्यांनाच फोन केला आणि उर्वरीत सामने खेळवण्यात येऊ नयेत असं म्हणत धमकवायला सुरुवात केली. त्यांच्या संभाषणाची ऑडियो क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

पंकज आणि केव्ही पटेल यांच्यातील संभाषणामध्ये पंकजने प्रश्न विचारला की मैदानामध्ये कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाते का ? मैदानामध्ये 75 हजार लोकं एकत्र जमत असून तिथे एकालाही जर लागण झाली असली तरी तो इतरांसाठी मोठा धोका असल्याचं पंकजने म्हटलं. पंकजने गुजरातचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याबद्दलही वाईट-साईट उद्गार काढले. हे दोघे गुजरातमधील कोरोना आटोक्यात आणण्यात अपयशी ठरल्याचे पंकजने म्हटले. कोरोनाचा संभाव्य फैलाव थांबवण्यासाठी उर्वरीत सामने रद्द करावेत अशी मागणी करतानाच पंकजने असं न झाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

पंकजने दिलेल्या धमकीनंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजात द्वेष पसरवल्याप्रकरणी त्याच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी मैदानामध्ये हिंदुस्थान- इंग्लंड दरम्यानचा तिसरा सामना मंगळवारी म्हणजेच 16 मार्च रोजी रंगणार आहे.