
सामना ऑनलाईन, अहमदाबाद
गुजरातमध्ये पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व शाळांमध्ये गुजराती भाषा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे हा निर्णय सीबीएसई, आयसीएसई, आयबी, सीआयएसईसी आणि आयजी, सीएसईच्या मंडळांशी संलग्न असलेल्या सर्व शाळांनाही लागू राहणार आहे.
गुजराती भाषेची राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना ओळख व्हावी या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्ष जूनपासूनच करण्यात येणार आहे. मात्र ज्या शाळांचे शैक्षणिक वर्ष पूर्वीपासून सुरू झालेले आहे. अशा शाळांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून होईल, असेही स्पष्ट केले आहे.
गुजरात राज्य शालेय पाठय़पुस्तक मंडळाने इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी पुस्तके मुद्रित केलेली असून ही पुस्तके बाजारात जूनअखेर उपलब्ध होतील. ही पुस्तके उपलब्ध असतील तर या पुस्तकामधील धडे विद्यार्थ्यांना ऑगस्टपासून शिकविता येतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.


























































