
धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर लावण्यावरून देशभरात वातावरण तापलेले असताना आता गुजरातमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गुजरात मधील मेहसाणा येथील एका गावात बुधवारी एका मंदिरात लाऊडस्पीकर वाजवला म्हणून 42 वर्षीय व्यक्तीला सहा जणांनी मिळून बेदम मारहाण केली. यानंतर या व्यक्तीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
गुजरातमध्ये मंदिरांमध्ये लाऊडस्पीकर वाजवण्यावरून हिंसक घटना घडण्याची आठवडाभरातील ही दुसरी वेळ आहे. मृत जशवंतजी ठाकोर हे मोलमजुरीचे काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. जशवंत यांचा मोठा भाऊ अजित यांचा जबाब घेत गुरुवारी पोलिसांनी सदाजी ठाकोर, विष्णूजी ठाकोर, बाबूजी ठाकोर, जयंतीजी ठाकोर, जावंजी ठाकोर आणि विनुजी ठाकोर यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला.
अजित यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सायंकाळी सात वाजता घडली. बुधवारी जशवंत आणि मी आमच्या घराजवळील मेलडी माता मंदिरात लाऊडस्पीकरवर आरती करत होतो. त्यावेळी सदाजी आमच्या जवळ आला आणि तुम्ही लाऊडस्पीकर इतक्या जोरात का वाजवत आहात? अशी विचारणा केली. यावेळी अजित यांनी त्याला आम्ही आरती करत असल्याचे सांगितले. लाऊडस्पीकर वाजवल्याबद्दल संतापलेल्या सदाजी याने आम्हाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
याला दोन्ही भावांनी विरोध केल्यावर सदाजीने आपल्या सहकाऱ्यांना बोलावले. यावेळी पाच जण घटनास्थळी धावत आले. यानंतर पाचही जणांनी लाठ्यांनी आम्हा दोघांवर हल्ला केला. यावेळी आमच्या 10 वर्षीय पुतण्याने त्याच्या आईला फोन केला आणि या घटनेची माहिती पोलिसांना दिली. गावकऱ्यांनी दोघा भावांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान जशवंतचा मृत्यू झाला.
























































