गुजरातच्या मंत्र्याकडून आसाराम बापूंवर कौतुकाचा वर्षाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। अहमदाबाद

गुजरातचे शिक्षण मंत्री भूपेंद्र सिंह चुडासमा यांनी साध्वी बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेले व सध्या तुरुंगात असलेल्या आसाराम बापूंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. आसाराम यांच्या संस्थेतर्फे दरवर्षी 14 फेब्रुवारीला मातृ-पितृदिन साजरा केला जातो. त्याबद्दल चुडासमा यांनी आसाराम यांची प्रशंसा केली आहे. आसाराम बापूंचा तुरुंगात असतानाही चुडासमा यांनी त्यांचे कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आपण काहीही चुकीचे केले नसल्याचे चुडासमा यांनी म्हटले आहे. चुडासमा यांनी आसाराम यांना शुभेच्छा पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी आसाराम यांच्या कामाचे कौतुक केले आहे. तुमच्या या कार्यक्रमामुळे तरुणांना आपल्या जबाबदारीची जाणीव होईल व ते चांगले नागरिक बनतील असे चुडासामा यांनी म्हटले आहे. चुडासामा यांच्या शुभेच्छा पत्रामुळे गुजरातमध्ये मात्र खळबळ उडाली आहे.

जगभरात 14 फेब्रवारी हा व्हेलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. पण याच दिवशी आसाराम यांच्या आश्रमात मातृ-पितृ पूजन केले जाते. मात्र साध्वी बलात्कार प्रकरणी दोषी ठरल्यानंतर आसाराम यांच्या समाजकारणावर प्रश्न चिन्ह लागले आहे. पण तरीही त्यांच्या संस्थेत आजही अनेक सामाजिक कार्यक्रम केले जात आहेत. आसाराम यांना अल्पवयीन साध्वीवर बलात्कार प्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून ते राजस्थानमधील जोधपूर तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.