नगरमध्ये व्हॉलीबॉल खेळणाऱया तरुणावर गोळीबार; दोनजण ताब्यात

फोटो प्रातिनिधीक

व्हॉलीबॉल खेळणाऱया एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना नगरमध्ये घडली आहे. यातील जखमीवर नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, याप्रकरणी दोनजणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सोमनाथ बाळासाहेब तांबे (वय 21, रा. भेंडा, ता. नेवासा) असे जखमीचे नाव आहे. पप्पू जावळे व गणेश पुंड अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. सोमनाथ तांबे हा आपल्या मित्रांसोबत रविवारी (दि. 2) रात्री भेंडा येथील एका मैदानावर व्हॉलीबॉल खेळत होता. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांपैकी एकाने खेळत असलेल्या तरुणांच्या दिशेने गोळीबार केला. त्यात गोळी लागल्याने सोमनाथ गंभीर जखमी झाला. गोळीबार करून हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.

याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जखमी सोमनाथ तांबे याचा जबाब घेऊन पप्पू जावळे व गणेश पुंड यांना ताब्यात घेतल्याची माहिती नेवाशाचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या