
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
सोमवारी सायंकाळी बुलढाण्यातून मोताळाकडे जाणार्या वाहनातून 3 लाखांचा गुटखा पकडला. याचवेळी मिळालेल्या माहितीवरून बुलढाणा तालुक्यातील रायपूर पोलीस ठाण्यांतर्गत रायपूर येथे सैय्यद सौदागर यांच्या घरामध्ये 64 गुटख्याच्या गोणी आढळून आल्या. या मुद्देमालाची अंदाजे 12 लाखांवर किंमत आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखा पथकाने केली आहे.
स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात तीन लाखांचा अवैध गुटखा सोमवारी जप्त केला. बुलढाणा येथे एका कारमध्ये दोघांकडुन हा गुटखा जप्त करण्यात आला आहे. बुलढाणा येथील जयस्तंभ चौकात स्वीफ्ट कार (क्र. यु.एच. 46 एएल 7839) मध्ये गुटखा येत असल्याची माहिती गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यांनी पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ व पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली जयस्तंभ चौकात कार अडवून पंचासमक्ष तिची तपासणी केली. यावेळी वाहनातील शेख राज मोहम्मद शेख ताज मोहम्मद, फारुख गनी खां कुरैशी (दोन्ही रा. पंचायत समिती मागे चिखली) यांचे वाहनात शासनाने प्रतिबंधित केलेला पान मसाला, विमल गुटखा, व्ही 1 तंबाखू किंमत तीन लाख 8 हजार व वाहनाची किंमती दीड लाख असा एकूण चार लाख 58 हजार मुद्दे माल जप्त केला. या कारवाईत पीएसआय इम्रान इनामदार, एएसआय प्रकाश राठोड, पोलीस हवालदार शेख. साजीद, श्रीकृष्ण चांदूरकर, पोका संदीप मोरे आदींनी सहभाग घेतला होता. पुढील कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे नितीन नवलकर करत आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाणा बुलढाणा येथे गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरु होती.
स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणाचे अधिकारी महेंद्र देशमुख यांना रायपूर येथे एका घरामध्ये गुटख्याचे पोते असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने रायपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रशांत सपकाळे, पोहेकाँ शांताराम जाधव, विजय पैठणे, महिला पोलीस मनिषा खंदे, दिपक राठोड, स्थागुशाचे पोउपनि इनामदार, एएसआय प्रकाश राठोड, सादीक शेख, श्रीकृष्ण राऊत, संदीप मोरे, भरतसिंह राजपूत यांनी घरांची झडती घेतली असता सैय्यद सौदागर यांच्या घरामध्ये 64 गुटख्यांचे पोते आढळून आले. हे गुटख्याचे पोते खाजगी वाहनाने रायपूर पोलीस ठाण्याला जमा करुन अन्न व औषधी विभागाचे अधिकारी नितीन नवलकर, नमुना अधिकारी प्रविण ढोके यांनी गुटख्याची तपासणी केली. सदर गुटख्याची किंमत 12 लाख रुपये असून सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































