…बलोपासना पुन्हा सुरू!

>> जयेंद्र लोंढे

समस्त फिटनेस क्षेत्रात उत्साहाचे वारे वाहू लागले आहेत. शासनाने आखून दिलेले नियम पाळण्याकडे प्रत्येकाचा कटाक्ष आहे. शक्ती उपासना सुरू होत आहे.

सकाळी नऊ ते पाच या वेळेत नोकरी… दोन ते तीन तास प्रवास… कुटुंबाला द्यावा लागणारा वेळ… घर सांभाळणाऱया गृहिणींची होणारी धावपळ… या सर्व धकाधकीच्या अन् व्यस्त वेळापत्रकामुळे शरीरावर विपरित परिणाम होऊ लागले आहेत. मानसिकदृष्टय़ाही प्रचंड ताण येऊ लागला आहे. अन् याच कारणामुळे जिम अन् फिटनेसला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे.

स्वतःला मानसिक व शारीरिक फिट ठेवण्यासाठी हिंदुस्थानातीलच नव्हे, जगातील बहुतांशी व्यक्तींची पावले जिम अन् फिटनेस सेंटरकडे वळू लागली आहेत. मात्र कोरोनामुळे मार्च महिन्यापासून जिम बंद होती. याचा परिणाम जनतेच्या आरोग्यावरही झाला. जिम मालक, खेळाडू यांची आर्थिक परिस्थिती ढासळली. आता कोरोना नियंत्रणात येऊ लागला आहे. महाराष्ट्र सरकारकडून दसरा या शुभमुहूर्तापासून जिम व फिटनेस सेंटर सुरू करायला परवानगी दिली आहे. यामुळे शरीरसौष्ठव या क्षेत्राशी निगडित असलेल्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

मार्च ते ऑक्टोबर या कालावधीत जिम बंद असल्यामुळे या क्षेत्राशी सर्वच ठप्प झाले होते. काही जिम मालकांनी यादरम्यान कर्मचाऱयांना वेतन दिले. तर काहींनी सुरुवातीच्या महिन्यांचे वेतन दिले. एवढेच नव्हे तर हातामध्ये एक दमडीही येत नसताना जिमच्या जागेचा हप्ता, भाडे, विजेचे बिलही जिम मालकांना भरावे लागत होते. यामुळे घर चालवण्यासाठीही तारेवरची कसरत जिम मालकांना करावी लागली. इतर खेळांनी ऑनलाइन सराव व स्पर्धांकडे मोर्चा वळवला. शरीरसौष्ठव यामध्येही ऑनलाइन सेशनचा अवलंब झाला खरा पण म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे या क्षेत्राशी सर्वच निराश झाले होते. यामधून लवकरात लवकर कसे बाहेर येता येईल याची वाट बघत होते. महाराष्ट्र सरकारकडून जिम सुरू करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आणि सुटकेचा निःश्वास टाकला गेला. यावेळी जिम प्रत्यक्षात सुरू झाल्याचा आनंद जिम मालक तसेच खेळाडूंच्या चेहऱयावर ओसंडून वाहताना दिसला.

जिम उघडण्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष द्यावे

जिममधील साहित्यांचे अंतर कमीतकमी सहा फुटांचे असावे.
साहित्य हलवण्याजोगे असल्यास सामाजिक अंतर राखले जाईल .
जिमबाहेर मोकळी जागा असल्यास तिथे साहित्य ठेवून उपयोग करू शकता.
जिममध्ये येण्याचा आणि जाण्याचा मार्ग जमिनीवर किंवा भिंतीवर खुणा करून स्पष्ट करावा.
पेमेण्टची प्रकिया कॉण्टॅक्ट लेस असावी. कार्डद्वारे फी घेऊ शकता.
एसीचे टेम्परेचर 24 ते 30 सेल्सिअसमध्ये असावे.
सामाजिक अंतर राखून लॉकर रूमचा वापर करावा.
डस्टबीन नेहमी बंद असावे.
स्पा, सॉना, स्टीम बाथ, स्वीमिंग पूल बंद असावे.

या सूचनांचे पालन अनिवार्य

कमीतकमी सहा फुटांचे अंतर असावे.
चेहऱयाला मास्क लावावे.
सराव करताना सातत्याने साबणाने हात धुवावेत.
खोकला किंवा शिंकण्याआधी चेहरा टिश्यू पेपर किंवा रुमालाने झाकावा. त्यानंतर तो टिश्यू डस्टबीनमध्ये व्यवस्थित फेकून द्यावा.
थुंकणे टाळावे.
आरोग्य सेतू अॅप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावे.

व्यायाम करण्याचे वेळापत्रक व योजना

नियमांचे पालन केल्यानंतर जागेनुसार योजना बनवावी व वेळापत्रक ठरवावे.
ग्रुप सेशनसाठी प्रत्येकास 15 ते 30 मिनिटे आधी बोलवावे.
ग्रुप फिटनेस क्लास ऑनलाइन घेण्यासाठी प्रयत्न करावा.
फिटनेससाठीचा व्यायाम व रूम पाहून ग्रुप फिटनेस सेशनसाठी व्यक्तींची मर्यादा ठरवावी.
पर्सनल ट्रेनिंगदरम्यान क्लाएंट व ट्रेनर यांनी कॉण्टॅक्ट होईल असा व्यायाम टाळावा.
प्रत्येक सत्रासाठी मेंबरची मर्यादा जागेनुसार ठरवावी.

व्यायाम झाल्यानंतर काय करावे

चेहऱयावरील मास्क, वापरेल्या टॉव्हेलची योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी.
वॉशरूम, लॉकर रूम विभाग सॅनिटाइज करावा.
जिममधील साधनांचे निर्जंतुकीकरण करावे.
जिममधील सर्व जागा स्वच्छ करावी.
बंद करण्याआधी सर्व ठिकाणी निर्जंतुकीकरण करावे.

जिम सुरू झाल्यानंतर

प्रवेशद्वारावर हॅण्ड सॅनिटायझर असावे. थर्मल स्क्रीनिंग असावे.
चेहऱयावर मास्क असलेल्यांनाच प्रवेश द्यावा.
कोरोनापासून कसे दूर राहता येईल. तसेच जागरूकता कशी करता येईल याबाबतचे पोस्टर लावावेत.
एकाच मॅटवर सर्वांनी व्यायाम करणे टाळावे.
श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यास तत्काळ व्यायाम थांबवावा.

जिम सुरू होणे गरजेचं होतं

मार्च महिन्यापासून जिम बंद आहे. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱयापासून जिम सुरू करायला परवानगी दिली. यासाठी त्यांचे मनापासून आभार. जिम सुरू होण्याची वाट बघत होतो. त्यासाठी सर्व तयारीही केली होती. अर्थात अजूनही कोरोना या आजाराला जनता घाबरत आहे. त्यामुळे इतक्या लवकर जिममध्ये मोठय़ा संख्येने उपस्थिती असणार नाहीए. पण माझ्यासारख्या असंख्य व्यक्तींचा उदरनिर्वाह जिम, फिटनेस सेंटरवर चालत आहे. त्यामुळे सध्या तरी जिम सुरू होणं गरजेचे होते, असे भावुक उद्गार हर्क्युलस जिमचा मालक विक्रांत देसाई याने दैनिक ‘सामना’शी बोलताना काढले.

कर्मचाऱयांसाठी नियम

जिममध्ये काम करणाऱया कर्मचाऱयांची डय़ुटी व उपस्थिती सामाजिक अंतर राहील अशाप्रकारे निश्चित करावी.
जिममध्ये साफसफाई करणाऱया कर्मचाऱयांना सर्व प्रकारची माहिती द्यावी. कचरा तसेच इतर फेकण्याच्या वस्तूंबाबत ट्रेनिंग द्यावी.

आपली प्रतिक्रिया द्या