एटीएम मशिन फोडणाऱ्या चोरट्यांना जीव धोक्यात घालून पकडले, हडपसर पोलिसांची धाडसी कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एटीएम मशिनवर दरोडा टाकणाऱ्या चोरट्यांचा डाव हडपसर बीट मार्शल पोलिसांनी जीव धोक्यात घालून उधळून लावला. चोरट्यांनी पोलिसांवर हल्ला केला, मात्र तरीही ताकदीच्या जोरावर पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

प्रशांत अभिमान कसबे (वय 22, रा. राजीव गांधी वसाहत, चव्हाणनगर, धनकवडी) आणि तेजस राजु जाधव (वय 19, रा. आंबेगाव पठार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हडपसरमधील आयडीबीआय एटीएममध्ये दोन चोर सीसीटीव्ही कॅमेरे तसेच एटीएम मशीन फोडून चोरी करीत असल्याची माहिती बुधवारी पहाटेच्या सुमारास आयडीबीआय सीसीटीव्ही कंट्रोल रूम मुंबईतून हडपसर पोलिसांना देण्यात आली.

त्यानुसार, कर्तव्यावरील महिला पोलीस शिपाई कांबळे यांनी पोलीस शिपाई शाम पांडुरंग येदले व पोलीस शिपाई सागर मारुती दळवी यांना संपर्क साधून माहिती दिली. रात्रपाळी कर्तव्यावर असणारे मार्शलवरील दोन्ही पोलीस क्षणाचा विलंब न लावता एटीएम कक्षाजवळ गेले. त्यावेळी दोन संशयित एटीएम मशीन हातोड्याने फोडून चोरी करीत असल्याचे दिसून आले. एटीएम खोलीतील दोन आरोपींना पकडताना एका चोराने पोलिसावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र शाम येदले यांनी वार चुकवला.

त्यानंतर पोलीस कर्मचारी सागर दळवी यांनी चोराला पकडले. तेव्हा येदले दुसऱ्या चोरास पकडण्यास गेले असता चोराने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तरीही येदले यांनी चोरास कुशलतने ताब्यात घेतले. काही वेळात घटनास्थळी रात्रपाळीचे अधिकारी एपीआय थोरात तसेच ऑपरेटर हाटकर, राऊत पोहोचले. त्यांनी चोरट्यांना ताब्यात घेत कटावणी, हातोडा, कोयता, बॅग, दुचाकी जप्त केली. ही कामगिरी उपायुक्त नम्रता पाटील, एसीपी बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलीस आयुक्तांनी केले कौतुक

धाडसी कर्तव्य करणारे पोलीस अंमलदार शाम पांडुरंग येदले आणि पोलीस अंमलदार सागर मारुती दळवी यांनी केलेल्या कामगिरीचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कौतुक केले आहे.