हाफिज सईद रचतोय हिंदुस्थानवर हल्ल्याचा कट

931

सामना ऑनलाईन, इस्लामाबाद

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि ‘जमात-उद-दावा’चा प्रमुख हाफीज सईद त्याच्या संघटनेवरील बंदीनंतरही लाहोरच्या कोट लखपत तुरुंगातूनच हिंदुस्थानवर जिहादी हल्ल्याचा भीषण कट रचत आहे. त्यासाठी त्याने पाकिस्तानातील अन्य दहशतवादी संघटनांशी संधान साधल्याचे वृत्त आहे.

 हाफीज सईदला नुकतीच पाकिस्तानच्या गुजरानवाला पोलिसांनी दहशतवादासाठी निधी गोळा करण्याच्या (टेरर फंडिंग) अटक केली होती. न्यायालयानेही हाफीजला दहशतवादी घोषित करून त्याची रवानगी लाहोरच्या कडेकोट सुरक्षा असलेल्या कोट लखपत तुरुंगात केली होती. पण पाकिस्तानी प्रशासनाच्या मेहेरबानीनेच हाफीजने ‘लष्कर ए तोयबा’सारख्या कडव्या जिहादी संघटनांशी संपर्क साधला आहे. हाफीज तुरुंगात बसून या संघटनांच्या मदतीने हिंदुस्थानच्या प्रमुख शहरांवर आत्मघाती दहशतवादी हल्ले घडविण्याची योजना आखत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे बकरी ईद, रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या असून त्यांनी हाफीज आणि त्याच्या अन्य दहशतवादी सहकाऱ्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले आहे. अमेरिकेला खूश करण्यासाठी याआधीही पाक सरकारने हाफीज सईदला आठ वेळा अटक केली आहे पण त्याच्यावर कोणतीही कारवाई सरकारने केलेली नाही असे पाकिस्तानचे माजी राजदूत वाजिद शमशुल हसन यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या