
सामना प्रतिनिधी । नागपूर
उन्हाळ्याचे दिवसात अंगातून घामाच्या धारा वाहण्याचे मोसम असताना जिल्ह्यातील सावनेर, रामटेक, मौदा तालुक्यांतील नागरिकांना शिमल्याचा क्षण अनुभवायला मिळाला. यावेळी वादळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली. त्यामुळे संत्रा, गहू, हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले. ऐन हातातोंडाशी आलेल्या पिकांचा शिमगा झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. गारपिटी मुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.
सावनेरात गहू झोपला, आंबा जमिनीवर
केळवद, हत्तीसरा खैरे, ढालगाव, नांदुरी, खामगाव, खापा, गडेगाव, अजनी, शिर्डी येथे बुधवारी मुसळधार पावसासह गारपीट झाली. हाताशी आलेला गहू, संत्रा, हरभऱ्याचे मोठे नुकसान झाले. गारपीटीची तीव्रता इतकी अधिक होती की, शेत व घरांच्या अंगण व छतावर गारांचे थर साचले होते. वादळी पावसामुळे काही ठिकाणी वृक्ष कोलमडल्याच्या घटना घडल्या. गावरान आंब्याचा मोहर व काही ठिकाणी कैरी गळून पडली आहे. त्यामुळे बळीराजावर पुन्हा अस्मानी संकट कोसळले. काही शेतकऱ्यांच्या घराच्या अंगणात ठेवलेला कापूस ओलाचिंब झाला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात आलेल्या मुसळधार पावसाने होत्याचे नव्हते केल्याने शेतकऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अचानक आलेल्या गारपीटीने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे सोमवार रात्रीपासून निर्सगाचा उग्र रूप दाखवायला सुरुवात केली. कृषी विभागाने पंचनामे करून तत्काळ बळीराजाला मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे.
खापा परिसरात टोमॅटोचे नुकसान
खापा: परिसरातील खापा, बडेगाव, कोच्छी, टेंभरडोह, वाकोडी, कोथुर्णा येथे बुधवारला दुपारी आलेल्या वादळी पावसाने उन्हाळी पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. तुरीच्या दानाएवढी गारांमुळे गहू, वांगे, टोमॅटो, मिरची आदी पिकांना फटका बसला़ वीजपुरवठाही खंडित होता़ शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. मंडळ अधिकारी व तलाठी यांनी तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तहसीलदारांकडे केली आहे.
मनसरात लिंबूएवढ्या गारा
बुधवारी आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे उभ्या शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले. दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. लिंबूएवढ्या तर काही कमी आकाराच्या गारा पडल्या. शेतातील बांधावर पांढराशुभ्र गारांचा सडा दिसून येत होता. परिसरातील शेतकऱ्यांचा गहू, हरभरा, आंबा, संत्रा, मोसंबी आणि लिंबू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय, मनसर परिसरात मोठ्या संख्येने विटांची राउंडभट्टी आहे. कच्च्या विटांची पार माती झाली असून त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.
काचुरवाही परिसराला फटका
रामटेक तालुक्यातील काचुरवाही, खोडगाव, नगरधन, मसला, खंडाळा, किरणापूर, चोखाळा, वडेगाव, हातोडी, लोहडोंगरी, संग्रामपूरसह अन्य गावांमध्ये बुधवारी (२० मार्च) दुपारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. काही ठिकाणी बोराच्या आकाराएवढ्या गारा पडल्या.
या गारपीटीचा मोठा फटका आंब्याच्या मोहराला बसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. तसेच परिसरातील गहू पीक जमिनीवर लोळले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. गहू, हरभरा, तूर पिकांच्या नासाडीमुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.
होळीच्या पर्वावर अवकाळी पाऊस
मौदा: होळीच्या पर्वावर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. निमखेडा, अरोली, कोदामेंढी, तुमान, खापरखेडा (तेली), खात, तांडा, घोटमुंढरी, शिवनी, पिपरी, दहेगाव, धानला, निहारवाणी, राजोली, नवेगाव (आष्टी), चाचेर, नेरला आदी गावांत वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, सुमारे वीस मिनिटे या गारांचा वर्षाव सुरू होता. त्यामुळे शेतातील गहू, हरभरा, मिरची व इतर पालेभाज्या पिकांचे नुकसान झाले. जणू पांढरी शुभ्र गारांची चादर चहुकडेपसरली होती. ढगांच्या गर्जनेचे वातावरण रात्री उशिरापर्यंत कायम होते. सायंकाळच्या सुमारास मौदा परिसरातही पावसाने हजेरी लावली. तालुक्यामध्ये पुन्हा वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तातडीने नुकसानीची पाहणी करून भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आहे.
संत्रा कोलमडला, मोसंबी झोडपली
काटोल तालुक्यातील मेटपांजरा जिल्हा परिषद सर्कलमधील मेटपांजरा, आंजनगाव, हातला, वाजबोडी, तरीबोडी या गावांना बुधवारी दुपारी चार वाजतादरम्यान आलेल्या वादळी पावसाने चांगलेच झोडपले. यामध्ये संत्र्यांची फळांनी लगडलेली झाडे मुळासह कोलमडली. वादळ व गारांच्या तडाख्यात गहू, हरभरा, संत्रा आणि मोसंबी तसेच फुल पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सोबतच अनेक गावांतील नागरिकांच्या घरावरील छपरे उडाली. गारपिटीने कवेलूंचा चुराडा केला आहे. मेंढेपठार बसस्थानकाजवळील मोठे झाड वादळाने उन्मळून पडले. सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही. परंतु काटोल नागपूर रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था प्रभावित झाली होती. घटनेची माहिती काटोलचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांना मिळताच त्यांनी तहसीलदार चरडे यांना घटनास्थळाची पाहणी करून मोका पंचनामाचे आदेश दिले. हातला, आजनगाव, कोहळा, सोनखांब, लिंगा या भागांतील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती आहे. या भागाची पाहणी पंचायत समिती सभापती संदीप सरोदे यांनी केली. तातडीने प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यास सांगितले. यावेळी आजनगावचे सरपंच बालू तायवाडे, हातलाचे शेतकरी प्रशांत वानखडे, कोमल देशमुख, नीलेश रिधोरकर, चांदूरकर यांची उपस्थिती होती.


























































