जबरदस्त गौप्यस्फोट! राष्ट्रपतींच्या हत्येचा कट रचण्यात सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींचा हात

हैतीचे राष्ट्रपती जोवेनेल मोईजे यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येप्रकरणी तिथल्या पोलिसांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. या संपूर्ण हत्या प्रकरणाच्या कटामध्ये तिथल्या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तीही सहभागी होत्या असं पोलिसांनी म्हटलं आहे. वेंडेल थेलॉट असं त्यांचं नाव असून काही आठवड्यांपूर्वी त्यांच्याविरूद्ध अटक वॉरंटही जारी करण्यात आलं होतं.

पोलिसांनी या प्रकरणी काही नवी तथ्ये उजेडात आणली आहेत. त्यांनी म्हटलंय की माजी न्यायमूर्ती वेंडेल या राष्ट्रपतींच्या हत्येपूर्वी मोईजे यांच्या मारेकऱ्यांपैकी काहींना भेटल्या होत्या. पोलिसांनी मोईजे यांच्या हत्ये प्रकरणी काही जणांना अटक केली असून यामध्ये भाडोत्री मारेकऱ्यांचा समावेश आहे. यातले काही मारेकरी हे कोलंबियातून आले होते असंही पोलिसांना कळालं आहे. हैती पोलिसांनी मोईजे यांचे मारेकरी शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. या हत्येचे सूत्रधार अमेरिकेत बसले असल्याचा हैती पोलिसांना संशय असून ते हुडकून काढण्याचा ते प्रयत्न करत आहेत. मोईजे यांच्या हत्येनंतर हैतीमध्ये मोठं संकट निर्माण झालं आहे. आधीच गरिबीशी झुंजणारा हा देश राजकीय अस्थिरतेत कोसळला आहे.

अटक वॉरंट जारी झाल्यानंतर वेंडेल बेपत्ता झाल्या असून त्यांनी या वॉरंटवर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. मोईजे यांच्याविरोधात बंड पुकारण्याचा एकदा प्रयत्न करण्यात आला होता. यामुळे संतापलेल्या मोईजे यांनी वेंडेल यांच्यासह अन्य दोन न्यायमूर्तींना पदावरून दूर केलं होतं. याचा बदला घेण्यासाठी वेंडेल यांनीही कटात भाग घेतला असावा असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी वेंडेल यांच्या घरावर छापा मारला असून त्यांच्या शोधासाठी अनेक ठिकाणी ‘वाँटेड’ ची भित्तीपत्रके चिकटवण्यात आली आहे. मोईजे यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांपैकी एका वरिष्ठ अधिकाऱ्यालाही पोलिसांनी मंगळवारी अटक केली असून त्याच्याकडून या कटाबाबत तसेच सूत्रधारांबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या