फेब्रुवारी 2021 पर्यंत अर्धा हिंदुस्थान कोरोनाबाधित, केंद्रीय समितीचा गंभीर निष्कर्ष

जगाला हादरवून सोडणारी कोरोना महामारी कधी संपेल याच्या प्रतीक्षेत सारेच आहेत. सध्या जगभरात कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी होत चालल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. हिंदुस्थानतही नव्या कोरोनाबाधितांचा आकडा कमी होऊ लागलाय. अशातच केंद्र सरकारने कोरोनाच्या देशातील परिस्थितीचे निरीक्षण मांडण्यासाठी नेमलेल्या समितीने काही गंभीर निष्कर्ष काढले आहेत.

केंद्रीय समितीच्या म्हणण्यानुसार, पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यापर्यंत अर्धा हिंदुस्थान म्हणजेच 50 टक्के हिंदुस्थानी कोरोनाबाधित झालेले असतील. समितीच्या या निष्कर्षाने देशवासियांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.

हिंदुस्थानातील कोरोनाग्रस्तांची संख्या 75 लाखांच्या पार गेली आहे. जगात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत असून त्याखालोखाल दुसरा क्रमांक हिंदुस्थानचा लागतो.

तथापि सप्टेंबरच्या मध्यापासून देशातील कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला आहे. मात्र सध्याच्या आकडेवारीच्या गणितानुसार तब्बल 30 टक्के हिंदुस्थानी कोरोनाबाधित असल्याचे केंद्रीय समितीने नमूद केले आहे.

आयआयटी, कानपूरचे प्राध्यापक आणि केंद्रीय समितीचे सदस्य मणिंद्र अगरवाल यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, आमच्या गणितीय मॉडय़ुलनुसार आजमितीला हिंदुस्थानात 30 टक्के नागरिकांना कोरोनाची बाधा झालेली आहे. हा आकडा फेब्रुवारी 2021 पर्यंत 50 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो.

सेरॉलॉजिकल सर्व्हे सांगतो फक्त 14 टक्के!

केंद्रीय समितीच्या निष्कर्षानुसार कोरोना संसर्गाचे प्रमाण केंद्र सरकारच्या सेरॉलॉजिकल सर्व्हेच्या कित्येक पटीने जास्त आहे. केंद्र सरकारच्या सप्टेंबरपर्यंतच्या सेरॉलॉजिकल सर्व्हेनुसार हिंदुस्थानात 14 टक्के नागरिक कोरोनाबाधित आहेत. मात्र हे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत असल्याचे केंद्रीय समितीचे निरीक्षण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या