
कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आलेला दिसत असला तरी कोरोनाचा धोका कायम असल्याचे वैद्यकीय तज्ञ सांगत आहेत. त्यामुळे भविष्यातील कोरोनाच्या संकटाचा आव्हानाचा सामना करण्यासाठी मुंबईतील परळ येथील हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळात कोव्हॅक्सिन लसीची निर्मिती करण्याची महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारने आखली आहे. या लसीची भविष्यातील गरज लक्षात घेऊन राज्य सरकारने 126 कोटींच्या वाढीव खर्चास मान्यता दिली आहे.
राज्य सरकारने लसीकरणात संपूर्ण देशात आघाडी घेतली आहे. आता तर बारा वर्षांवरील विद्यार्थ्यांना व सर्वांना बूस्टर डोस दिला जात आहे. त्यामुळे लसीकरणाची वाढती गरज लक्षात घेऊन राज्य सरकारने पुढाकार घेऊन हाफकिनमध्ये लसनिर्मितीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आखला आहे.
मुख्यमंत्र्यांचा पुढाकार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील हाफकिन बायोफार्माला बळ देण्याची मागणी केली होती. महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीतील हाफकिन बायोफार्माला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटही दिली होती. राज्यातील लसीकरणाला बळ देण्यासाठी हाफकिनने कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या उत्पादनात पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांनी हाफकिन संस्थेला बळ देण्यासाठी पुढाकार घेतल्याने आता देशांतर्गत लस उत्पादन वाढण्याला वेग येणार आहे.
भारत बायोटेकसोबत करार
लस उत्पादनात आघाडीवर असलेल्या हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळात केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने कोव्हॅक्सिन लस उत्पादन करण्यात येणार आहे. त्यासाठी हैदराबाद येथील भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडसोबत करार करण्यात येणार आहे.
लसनिर्मितीच्या या प्रकल्पासाठी 154 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी पेंद्र सरकारने 65 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर केले आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने पहिल्या टप्प्यात कोव्हॅक्सिन लसीसाठी 126 कोटी 15 लाख रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी पेंद्राचा हिस्सा 70 कोटी 8 लाख रुपये तर राज्याचा हिस्सा 56 कोटी 8 लाख रुपये असेल.
































































