लोहा प्रशासकीय इमारतीवर गळफास लावून दिव्यांगाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कंधार रस्त्यावरील लोहा प्रशासकीय इमारतीच्या गच्चीवरील लोखंडी गजाला गळफास घेऊन एका त्रेचाळीसवर्षीय दिव्यांग शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी समोर आली. ही घटना समजताच घटनास्थळी नातेवाईकांनी धाव घेत दोषी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह काढू देणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

लोहा तालुक्यातील उमरा येथील भीमराव चंपती शिरसाट (वय – 43) या अल्पभूधारक शेतकऱ्यास दोन वर्षांपूर्वी पक्षाघाताचा झटका आला होता. उपचारांनंतर मयत भीमराव हा पूर्वीप्रमाणे बरा झाला नाही, मात्र थोडे चालणे-बोलणे इतपत तो बरा झाला. घरात आई-वडील, पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार असताना कुटुंबाचा पुढील उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न भीमराव शिरसाट यांच्यापुढे होता.

अर्धांगवायूमुळे शरीराची एक बाजू निकामी झाल्याने पूर्वीसारखे काम होत नाही आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची मग करावे काय त्यात शेतीसाठी शासकीय तसेच खासगी फायनान्सकडून कर्ज घेतले होते. या विवंचनेत असताना त्यांनी दिव्यांग संघटनेत काम सुरू करत दिव्यांगाचा निधी मिळावा, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. अनेक वेळा खेटे मारूनसुद्धा प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे कंटाळून भीमराव शिरसाट यांनी लोहा प्रशासकीय इमारतीवर जाऊन लोखंडी गजास दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. भिंतीवर चढण्यासाठी बाजूस पडलेल्या भंगार खुर्चीचा वापर करण्यात आला.

घटनास्थळी लोहाचे तहसीलदार विठ्ठल परळीकर, लोहा पोलीस ठाण्याचे पो. नि. संतोष तांबे, शिवसेनेचे नियोजन समिती सदस्य नवनाथ बापू चव्हाण, माजी सभापती सतीश पाटील उमरेकर व शिवसेना शहरप्रमुख मिलिंद पवार आदींनी भेट दिली.

उशिरापर्यंत नातेवाईकांकडून संबंधित दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी ठिय्या दिला.