एप्रिलनंतर हापूस गरीबांच्या खिशात मावणार, बागायतदार समीर पटवर्धन यांचा अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणातल्या आंब्याची वाट पाहणाऱयांनो जरा धिर धरा… यंदाचा अस्सल आंबा तोही स्वस्त दरात तुम्हाला खाण्यासाठी एप्रिलच्या शेवटापर्यंत म्हणजे 25 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. अवकाळीच्या कचाट्यात सापडलेला हापूसच्या किमतीत खऱया अर्थाने माफक दरात खवय्यांना उपलब्ध होणार असल्याचे आंबा बागायतदार समीर पटवर्धन यांनी सांगितले.

पटवर्धन यांनी जी आय मानांकन घेतले असून त्यांचा गणेश मँगोज् या ब्रँडखाली ते पुणे-मुंबई मार्केटमध्ये आंबा विक्रीसाठी उपलब्ध असतो. इतकेच नव्हे तर पणन मंडळाच्या माध्यमातून गणेश मँगोज् आखाती देशांतही पोहचतो.

गेली 35 वर्षं पटवर्धन आंबा व्यवसाय करतायत. आंबा व्यवसायात पूर्वीपेक्षा नफा कमी झाला आहे. औषधांची फवारणे केलेल्या आंब्याच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. तर दुसरीकडे कामगारांच्या मजुरातही वाढ झाल्याने खर्च वाढला आहे. मात्र आंबा उत्पादन आहे तितकेच असल्याने नफा कमी झाल्याची खंत आंबा बागायतदार समीर पटवर्धन यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना व्यक्त केली.

समीर पटवर्धन म्हणाले की, यंदा नोव्हेंबर महिन्यात आलेल्या मोहराचा म्हणजे पहिल्या उपऱयाचा आंबा बाजारात आला आहे. सध्या रत्नागिरी हापूस आंबा पेटीचा दर 3 ते 5 हजार रुपये आहे. मात्र बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने दुसऱया टप्प्यात आलेल्या मोहरातून परागीकरण न झाल्याने आंबा आला नाही. आता तिसऱया टप्प्यातील मोहराकडे लक्ष असून हा 10 ते 15 एप्रिलपर्यंत बाजारात येईल, अशी अपेक्षा पटवर्धन यांनी व्यक्त केली.

कर्नाटकी हापूसला ‘ती’ चव नाही

बाजारात हापूस म्हणून कर्नाटकी आंबा विकला जातो. यावेळी स्वस्त म्हणून किंवा हापूस म्हणून कर्नाटकचा आंबा खरेदी करून ग्राहक फसतात. कर्नाटकी आंबा आतून पिवळा असतो तर हापूस केशरी असतो. म्हणून आम्ही आंबा कापून दाखवतो. तसेच कर्नाटकी आंब्याला हापूसची चव येऊ शकत नसल्याचेही पटवर्धन सांगतात.