हरयाणात येणार भाजपचे युती सरकार, ‘जेजेपी’ला देणार उपमुख्यमंत्रीपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आलेल्या हरयाणात सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपने दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीबरोबर (जेजेपी) युती केली आहे. या युतीच्या फॉर्म्युल्यानुसार भाजपचा मुख्यमंत्री आणि जेजेपीचा उपमुख्यमंत्री असणार आहे.

भाजप अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत भाजप-जेजेपी युतीची घोषणा केली. यावेळी जेजेपीचे अध्यक्ष दुष्यंत चौटाला, मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा आदी उपस्थित होते.

हरयाणाच्या जनतेने जो कौल दिला आहे त्याचा सन्मान करून ही युती केली आहे. भाजप आणि जेजेपी एकत्र येऊन सरकार स्थापन करतील. ही युती 5 वर्षे स्थिर सरकार देईल. भाजपचा मुख्यमंत्री होईल, तर जेजेपीचा उपमुख्यमंत्री असेल असे गृहमंत्री शहा यांनी सांगितले. दरम्यान, हरयाणात स्थिर सरकार देण्यासाठी भाजपबरोबर युती केल्याचे चौटाला म्हणाले.

शनिवारी सरकार स्थापनेचा दावा करणार

शनिवारी (दि. 26) भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड होईल. त्यानंतर सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू केली जाईल. भाजपकडून राज्यपालांकडे जेजेपीच्या दहा आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र देऊन सरकार स्थापनेचा दावा करू. अपक्ष आमदारांचाही आम्हाला पाठिंबा असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.

कोणालाच बहुमत नाही

  • महाराष्ट्राबरोबर हरयाणात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. हरयाणात सर्व पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढले होते. निकालानंतर विधानसभेच्या 90 जागांपैकी कोणत्याही पक्षाला बहुमतासाठीच्या 46 जागा मिळाल्या नाहीत.
  • 2014 मध्ये 47 जागा मिळवून स्वबळावर सत्तेवर आलेल्या भाजपला यावेळी 40 जागा मिळाल्या.
  • दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपीला 10 जागा मिळाल्या आहेत.
  • 2014 मध्ये काँग्रेसला 17 जागा मिळाल्या होत्या. यावेळी 31 जागांवर विजय मिळाला.
  • अभय चौटाला यांच्या इंडियन नॅशनल लोकदलास एक जागा मिळाली आहे. सात अपक्ष आमदार निवडून आले असून एकजण अन्य पक्षाचा आहे.