
मध्य रेल्वेच्या हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर रुळांचे वळण मोठय़ा प्रमाणावर असल्याने लोकलच्या चाकांची सारखी झिज होऊन त्यांना ‘मेन्टेनन्स’साठी वारंवार कारखान्यात पाठवावे लागते. त्यामुळे लोकलच्या फेऱयांवर परिणाम होत असतो. लोकलची चाके लवकर झिजू नयेत यासाठी मध्य रेल्वेने चाकांवर वंगणाचा मारा सातत्याने करणारी ‘चाक वंगण प्रणाली’ यंत्रणा विकसित केली आहे. त्यामुळे चाकांची झीज कमी होणार असून प्रवाशांना अधिक चांगली सेवा देता येणे शक्य होणार आहे.
सीएसएमटी ते वाशी-पनवेल तसेच ठाणे – वाशी – पनवेल अशा हार्बर व ट्रान्सहार्बर मार्गावर वळणे अधिक प्रमाणात असून त्यामुळे लोकल गाडय़ांच्या चाकांची वारंवार झीज होत असते. त्यामुळे लोकलची फेरी पूर्ण झाल्यावर तिला कारशेडमध्ये नेऊन चाकांची तपासणी करावी लागत असते. त्यामुळे लोकलच्या फेऱयांवर परिणाम होत असतो. यासाठी वर्तुळाकार लोखंडी चाकांच्या रुळांना स्पर्श होणाऱया चकतीवर वंगणाचा (ल्युब्रिकेडंट ऑईल) सातत्याने मारा करता यावा यासाठी खास टँक बसविण्यात आला आहे. त्यामुळे चाकांचे घर्षण कमी होण्यास मदत होणार असल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन यांनी सांगितले.
प्रथम जलद मार्गावर पंधरा डबा
पश्चिम रेल्वेवर 15 डब्यांच्या पाच लोकल धावत असून त्यांच्या 54 फेऱ्यांद्वारे प्रवाशांना दिलासा मिळत आहे. मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या दोन गाडय़ा असून तिच्या सीएसटी ते कल्याण-ठाणे-डोंबिवली दरम्यान 20 फेऱ्या होत आहेत. याबाबत विचारले असता एस. के. जैन यांनी मध्य रेल्वेच्या कल्याणच्या पुढील प्रवाशांना पंधरा डब्यांच्या लोकल पुरविण्याची योजना आखण्यासाठी एजन्सीची निवड सुरू असून आधी जलद मार्गावर पंधरा डबा सुरू केला जाईल असे स्पष्ट केले. कल्याण ते अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, कसारा, खोपोली मार्गावर 15 डब्यांच्या फेऱया सुरू करण्यात येणार आहेत.




























































