
सामना प्रतिनिधी । मुंबई
सध्या हार्बरच्या कुर्ला स्थानकाला एलिवेटेड करण्याचे काम सुरू आहे. हार्बरच्या प्रवाशांना आडवी जाणाऱया मालगाडीसाठी कुर्ला ते वडाळा स्वतंत्र मार्ग बांधला जात आहे. त्यामुळे टिळकनगर ते कुर्ला ही हार्बरची स्थानके उन्नत स्वरूपात (एलिवेटेड)बांधली जाणार असून त्याच्या खालून मालगाडय़ांचा मार्ग जाणार आहे. त्यामुळे हार्बरचा प्रवास वेगवान होणार आहे.
वडाळा ते कुर्ला मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका टाकण्याचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. या मार्गावरून पोर्ट ट्रस्टसाठी जाणाऱया मालगाडय़ांची वाहतूक केली जात असून एका मालगाडीला पन्नास डबे असल्याने तेवढा वेळ हार्बरच्या लोकल रखडत असल्याने सीएसएमटी ते पनवेल व अंधेरी लोकलच्या प्रवाशांची लटकंती होत आहे.वडाळा ते कुर्ला मालवाहतुकीसाठी सध्या रेल्वे मार्ग बांधला जात असून तो भविष्यात डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरचा फिडर रूट ठरणार आहे. या कामासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट निधी पुरवत असून वडाळा-रावळी परिसरातील झोपडपट्टीवासीयांचे एमएमआरडीए पुनर्वसन करीत आहे. मानखुर्दच्या लल्लुभाई कम्पाऊंड येथे झोपटपट्टीवासीयांचे पुनर्वसन होणार आहे.
हार्बर टिळकनगर ते कुर्ला एलिवेटेड धावणार
ट्रॉम्बेला आणि मुंबई पोर्ट ट्रस्टला जाणाऱया व येणाऱया मालगाडय़ांसाठी सध्या हार्बरचा कुर्ला ते वडाळा मार्ग वापरला जातो. त्यामुळे हार्बरची टिळकनगर ते कुर्ला ही स्थानके एलिवेटेड बांधण्याचे काम सुरू आहे. ही स्थानके कार्यरत होतातच या मार्गावरून हार्बर एलिवेटेड धावणार आहे. आणि तिच्या खालून मालगाडय़ांची वाहतूक होणार आहे.

























































