तेलही गेलं, तुपही गेलं अन्… टी-20 वर्ल्डकपपूर्वी उपकर्णधार हार्दिक पंड्याला BCCI चा दणका

इंडियन प्रीमियर लीगच्या 17व्या हंगामातील शेवटचा सामना मुंबई इंडियन्स शुक्रवारी घरच्या मैदानावर वानखेडे येथे खेळली. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध झालेल्या या लढतीत मुंबईला पराभूत व्हावे लागले. त्यामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेत सर्वात तळाला गेला.

यंदाच्या हंगामात मुंबईने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून गुजरात टायटन्सकडून आयात केलेल्या हार्दिक पंड्याकडे नेतृत्व सोपवले होते. मात्र हा बदल मुंबईच्या संघासह हार्दिकलाही मानवला नाही. फलंदाजी आणि गोलंदाजीतही हार्दिकची कामगिरी सुमार राहिली. अखेरच्या लढतीतही तो काही खास करू शकला नाही. एकीकडे संघासह वैयक्तीक कामगिरी खराब राहिलेल्या हार्दिकला आता बीसीसीआयनेही दणका दिला आहे.

लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध झालेल्या लढतीत हार्दिक पंड्यावर स्लो ओव्हर रेटमुळे कारवाई करण्यात आली. हार्दिक तिसऱ्यांदा दोषी आढळल्याने त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आयपीएल 2025 सुरू होईल तेव्हा हार्दिक पहिला सामना खेळू शकणार नाही. या बंदीसह बीसीसीआयने त्याला 30 लाखांचा दंडही ठोठावला आहे.

आयपीएलमध्ये हार्दिकवर पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या लढतीत पहिल्यांदा स्लो ओव्हर रेटमुळे कारवाई करण्यात आली होती. पहिल्यांदा त्याला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सविरद्ध झालेल्या पहिल्या लढतीतही हीच चूक केल्याने त्याला 24 लाखांचा दंड झाला. आता शेवटच्या लढतीतही तीच चूक केल्याने त्याला 30 लाखांचा दंड आणि एका सामन्याची बंदी अशी शिक्षा देण्यात आली आहे. यासह संघातील इतर खेळाडूंना मॅच फीच्या 50 टक्के किंवा 12 लाख यापैकी जी रक्कम कमी असेल तो दंड म्हणून द्यावी लागेल.

पंड्याआधी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत याच्यावरही अशी कारवाई करण्यात आली होती. यामुळे पंत 12 मे रोजी रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध झालेला सामना खेळू शकला नव्हता.