हर्षवर्धन नवा महाराष्ट्र केसरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुस्तीप्रेमींचा जनसागर होता; पण तो उसळलेला नव्हता. प्रतिस्पर्धी मल्ल एकाच तालमीतील असल्याने जल्लोषातही जोश नव्हता. दोन जिवाभावाच्या दोस्तांमध्येच कुस्ती असल्याने पाठिराख्यांमध्येही खुन्नस नव्हती. उभय मल्ल एकाच गुरूचे चेले असल्याने गुरूच्याही जिवाची घालमेल नव्हती. अशा निरस वातावरणात झालेल्या किताबी मल्लयुद्धात नाशिक जिह्याच्या हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेला 3-2 गुणांनी हरवून मानाची महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली. मात्र हर्षवर्धनने 63व्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबावर नाव कोरताच हरलेल्या शैलेशला खांद्यावर उचलून घेत आखाडय़ावर मिरवले. एवढेच नव्हे तर जिंकलेली चांदीची गदाही त्याने शैलेशकडे सोपवून ‘ही दोस्ती तुटायची नाय’ हे उपस्थित कुस्तीशौकिनांच्या साक्षीने दाखवून दिले.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते ही चांदीची गदा हर्षवर्धनला प्रदान करण्यात आली. हर्षवर्धन सलगीर व शैलेश शेळके या तुफानी मल्लांमध्ये चौदंडी सुरू झाली. हर्षवर्धनने शैलेशला झटका देत खाली ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर नुसतीच लोटालोटी झाल्याने आखाडय़ात काहीच घडले नाही. शेवटी पंचांनी हर्षवर्धनला समज देत पुढच्या 30 सेंकदांतच गुण घेण्यास सांगितले. मात्र त्याला गुण न घेता आल्याने शैलेशला एक गुण बहाल करण्यात आला. त्यानंतर पंचांनी शैलेशला दुसऱयांदा निक्रीय कुस्तीबद्दल समज देत 30 सेंकदांतच गुण घेण्यास सांगितले. त्यात तो अपयशी ठरल्याने उभय मल्लांमध्ये 1-1 अशी बरोबरी झाली. अखेरचे काही सेकंद शिल्लक असताना हर्षवर्धनने चपळाईने एकेरी पटात घुसून शैलेशच्या पाठीवर पकड घेत दोन गुणांची कमाई केली अन् ही किताबी कुस्ती जिंकली.

…अखेर न्याय मिळाला! 

‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत आमच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलातील अनेक मल्ल अंतिम फेरीत यायचे. मात्र पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा त्यांना बऱयाचदा फटका बसला. वेळोवेळी मी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचाही प्रयत्न केला. मात्र अन्यायानंतरही आम्ही खचलो नाही.  तब्बल 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा हर्षवर्धन सदगीच्या रूपाने पहिल्यांदा आमच्या तालमीतील मल्लाने जिंकली. अखेर आम्हाला न्याय मिळाला.’

काका पवार (हर्षवर्धन व शैलेश यांचे वस्ताद) 

या स्पर्धेतून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मल्ल घडतील!

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही महाराष्ट्राची शान आहे. महाराष्ट्र केसरीची गदा कोण जिंकणार याबाबतचा सर्वांचा अंदाज चुकीचा ठरला. दोन नवीन मल्ल किताबी लढतीसाठी पुढे आले. हीच खरी कुस्तीची किमया आहे. या स्पर्धेतून भविष्यात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मल्ल घडतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

प्रथमच झाली डोपिंग टेस्ट 

‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेच्या इतिहासात यंदा प्रथमच मल्लांची डोपिंग टेस्ट झाली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद गेल्या अनेक वर्षांपासून डोपिंग टेस्ट व्हावी यासाठी प्रयत्न करत होती. अखेर यंदा ‘नाडा’ने किताबी लढत रंगलेल्या मल्लांची मंगळवारी डोपिंग टेस्ट घेतली. इतर काही मल्लांची डोपिंग टेस्ट झाली की नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही.