
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १०० वर्षात देशाला नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीसांसारखी भ्रष्ट माणसे दिली. जातीवाद व भांडवलशाहीचा विळखा आणखी घट्ट झाला आहे, आता १०० वर्ष होत असताना पंचागानेही चांगला मुहूर्त दिला असून २ ऑक्टोबर रोजी दसरा, गांधी जयंती व रा. स्व. संघाची शंभरी असा योगायोग असून दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करत संघ बरखास्त करा व संविधानाचा मार्ग अवलंबा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालापात ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष ॲड. अभय छाजेड, पुणे काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, वरिष्ठ प्रवक्ते गोपाल तिवारी यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, यापुढे नथुराम चालणार नाही तर संविधानच चालेल असे संकेत नियतीनेच दिले आहेत. सर्वांनाबरोबर घेऊन जाणारा संविधानाचा विचारच चालणार आहे, त्यामुळे संघाने नागपूरच्या रेशीम बाग कार्यालयात संविधान ठेवावे. २८ तारखेपासून संविधान सत्याग्रह यात्रा आयोजित केली असून यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी रेशीम बागेत जाऊन संघाला संविधान भेट देणार आहेत.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी मतचोरीची एक एक प्रकरणे पुराव्यासह उघड करत आहेत, राहुल गांधी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारत आहेत, पण उत्तरे मात्र भाजपाचे नेते देत आहेत. राहुल गांधींची पत्रकार परिषद होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याला उत्तर देतात, राहुल गांधींचा लेख प्रकाशित होताच फडणवीस त्याला उत्तर देणारा लेख लिहतात, हे काय चालले आहे. फडणवीस निवडणूक आयोगाचे वकील आहेत, का दलाल? असा प्रश्न उपस्थित होतो. महाराष्ट्रात राजुरा मतदार संघात मतचोरी झाली त्यावर अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे तरीही फडणवीस आयोगाच्या वतीने का बोलतात? रामराज्याची भाषा करता मग अग्निपरिक्षेला का घाबरता? असा प्रश्न सपकाळ यांनी विचारला आहे.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. महिलांवरील अत्यचार वाढले आहेत. कोयता गँग, आका, खोक्या गँग, रेती गँगने धुमाकुळ घातला आहे. केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढली जाते त्यावर कारवाई करावी यासाठी केंद्रीय मंत्र्याला पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या द्यावा लागतो एवढी गंभीर स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाही, फडणवीस वेळ देऊ शकत नाहीत म्हणून पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी समाजवादी एकजुटता संमेलनाला उपस्थिती लावली, यावेळी ते म्हणाले की, भारताचे शेजारी देश श्रीलंका, बांगलादेश व नेपाळ मधील परिस्थिती विदारक असून स्थानिक जनतेचा उद्रेक झाला व अत्यंत वाईट पद्धतीने सत्ताधाऱ्यांना जीव मुठीत घेऊन पळावे लागले. भारतात गरिब व श्रीमंत यांच्यातील दरी वाढत चालली आहे. सरकार लाडक्या उद्योगपतीला एक रुपये एकर दराने जमीन दिली. मुंबईतील धारावी, गोरेगाव मधील जमीन कवडीमोल भावाने दिली. नवी मुंबई विमानतळही देऊन टाकला. तर गरज नसताना ८८ हजार कोटी रुपयांचा शक्तीपीठ महामार्ग बनवला जात आहे. सरकारकडे पगार करण्यास पैसे नाहीत, लाडक्या बहिणी साठी पैसे नाहीत, शेतकऱ्यांना देण्यास पैसे नाहीत पण लाडक्या उद्योगपतीसाठी मात्र रेड कार्पेट अंथरले जात आहे, असेही सपकाळ म्हणाले.