
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राहुल गांधी द्वेषाची काविळ झाली असून मोघलांना जसे धनाजी संताजी दिसत होते तसे भाजपा व देवेंद्र फडणवीस यांना दिवसरात्र राहुल गांधीच दिसत आहेत, त्याच भितीपोटी ते दररोज राहुल गांधी यांच्यावर टीका करत असतात. खरे लायर तर दिल्लीत बसले असून महाराष्ट्रात थीफ मिनिस्टर बसले आहेत, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांची आढावा बैठक छत्रपती संभाजी नगर येथे पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री मधुकर चव्हाण, आ. अमित देशमुख, आ. डॉ. विश्वजीत कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, खासदार कल्याण काळे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, आ. राजेश राठोड, काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर , शहराध्यक्ष युसुफ शेख आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले असतानाही अजून या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. अद्याप आरक्षणही जाहीर झालेले नाही. परंतु काँग्रेस पक्षाने या निवडणुकांसाठी तयारी सुरु केली आहे. आघाडीचा निर्णयावर राज्य पातळीवर चर्चा झालेली नसून स्थानिक पातळीवरच मित्रपक्षांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, संघटनात्मक बांधणीवर यावेळी विचार विनिमय करण्यात आला. काँग्रेस पक्ष हा सामान्य कार्यकर्त्यांचा असून मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला आजही मोठे जनसमर्थन आहे. मस्साजोग ते बीड पदयात्रा, परभणीतील संविधान बचाव यात्रा, परळीतील सद्भावना सत्याग्रह तसेच नांदेडमध्ये झालेली शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली यातून काँग्रेस पक्षात आजही जोश व उत्साह कायम आहे हे दिसून आलेले आहे. काही नेते काँग्रेस पक्ष सोडून गेले असले तरी कार्यकर्ता मात्र काँग्रेस पक्षासोबतच आहे हे स्पष्ट झाले आहे.























































