300 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कोरोना योद्ध्याचा कोरोनाने मृत्यू; रुग्णालयात बेडही मिळाला नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीच्या काळात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोरोना काळात 300 कोरोना बाधितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कोरोना योद्ध्याला कोरोनाची लागण झाली. मात्र, त्यांना उपचारासाठी बेडही मिळाली नसल्याने त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना हरयाणात घडली आहे.

प्रविण कुमार(43) असे या कोरोनायोद्ध्याचे नाव आहे. प्रविण यांच्यावर हिसार महापालिकेने कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी दिली होती. त्यासाठी पालिकेने एक पथक तयार केले होती. त्या पथकाचे प्रमुख प्रविण कुमार होते. कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत त्यांच्या विभागात 750 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. यापैकी तीनशे रुग्णांचे अंत्यसंस्कार प्रविण आणि त्यांच्या पथकाने केले. त्यांनी शहरात दिवसाला 20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली.

प्रविण यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची ऑक्सिजनची पातळी खालावली होती. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रविण यांचे कुटुंब तब्बल तीन तास सरकारी रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, तिथे त्यांना बेड मिळाला नाही. अखेर तिथल्या एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र, सोमवारी रात्री कोरोनामुळे त्यांचे निधन झाले.

देशभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तसेच कोरोना महामारीच्या काळात कोरोनाबाधितांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या कोरोना योद्ध्याला उपचारासाठी बेडही मिळाला नसल्याने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.