#CoronaCrisis -हरियाणा रुग्णालयात ऑक्सिजन संपल्यामुळे 4 रुग्णांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात सध्या सुरू असलेल्या कोरोना संकटात अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. याच दरम्यान हरियाणातील गुरुग्राम येथील रुग्णालयात ऑक्सिजन संपल्यामुळे 4 कोरोना रुग्ण दगावले आहेत. जिल्हा प्रशासनाला वारंवार याबाबत माहिती देऊनही ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने या चार जणांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी अकरा वाजता कठुरिया रुग्णालयात अचानक ऑक्सिजन पुरवठा संपला. ज्यामुळे ही घटना घडली. कोरोना संसर्ग झालेल्या चार रुग्णांच्या मृत्यूमुळे मृतांच्या कुटुंबियांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ते जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करीत आहेत.

दरम्यान, दिल्लीतही कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर होताना दिसत आहे. येथे रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजनची तीव्र कमतरता भासत आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील जयपूर गोल्डन रुग्णालयामध्ये ऑक्सिजन अभावी 25 रुग्णांचा मृत्यू झाला होता.