
सामना ऑनलाईन। हरयाणा
सेल्फीचा नाद जीवावर बेतू शकतो हे माहीत असूनही तरुणांमध्ये सेल्फीची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. याच सेल्फीच्या नादात हरयाणातील पानिपत येथे रुळावर उभे राहून सेल्फी घेताना तीन तरुणांचा रेल्वेखाली चिरडल्याने मृत्यू झाला आहे. हे तिघेही तरुण मूळचे उत्तर प्रदेशचे असून नातेवाईकांच्या लग्नासाठी हरयाणा येथे आले होते. चमन, सनी, आणि किशन अशी या तरुणांची नावे आहेत.
हे तिघेही तरुण अलिगढचे होते व मजूराचे काम करत होते. पानिपत येथे ते एका नातेवाईकाच्या लग्नासाठी आले होते. लग्न दुसऱ्या दिवशी असल्याने चमन, सनी आणि किशन व दिनेश हे चौघेही फिरण्यासाठी म्हणून घराबाहेर पडले होते. फिरता फिरता ते पानिपत पार्कजवळ पोहोचले. तेथे रेल्वे रुळावर उभे राहून ते सेल्फी घेऊ लागले. दिनेशने त्यांना रेल्वे रुळावर सेल्फी घेणे धोकादायक असल्याचे सांगत दुसरीकडे जाऊया असे सांगितले. पण तिघांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. याचदरम्यान पॅसेंजर रेल्वे येत असल्याचे दिनेशने बघितले व त्यांना रुळावरून बाजू होण्याचा इशारा केला. पण तिघांनी त्याकडे दुर्लक्ष करत पोझ घेत सेल्फी काढणे सुरूच ठेवले. यामुळे दिनेशने त्यांच्या दिशेने धाव घेत त्यांना रुळावरून बाजू हटण्यास सांगितले व स्वत: दुसरीकडे उडी घेतली.
हे बघताच तिघे तरुण हादरले व गोंधळून त्यांनी ज्या रुळावरून पॅसेंजर गाडी येत होती त्याच रुळावर उड्या मारल्या. यामुळे तिघे गाडीखाली चिरडले गेले. हा अपघात इतका भयकंर होता की या तिघांच्या शरीराचे तुकडे 30 फूट लांब अंतरापर्यंत उडाले. तिघा मित्रांचे छिन्नविछिन्न मृतदेह पाहताच दिनेश बेशुद्ध झाला. त्यानंतर काहीजणांनी पोलिसांना कळवले. दिनेशला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे.



























































