
सामना ऑनलाईन । रोहतक
हरयाणातील रोहतक जिल्ह्यातील एका महिलेने तिच्या शाळेतील मैत्रिणीसोबत लग्न करण्यासाठी लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून स्वत:चे पुरुषात रुपांतर केले. लिंगबदलानंतर त्यांनी लग्नही केलं व ते पतीपत्नीसारखे राहू लागले. मात्र आता वर्षभरानंतर या जोडप्यातील पत्नीने पतीसोबत राहण्यास नकार दिला आहे. जिच्यासोबत लग्न करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून लिंग बदलले तीच आता सोबत राहण्यास नकार देत असल्याने पती हैराण झाला आहे.
चरखी दादरी गावात राहणाऱ्या दोन तरुणींचे शाळेपासून एकमेकींवर प्रेम होते. त्या दोघींना एकमेकांसोबत लग्नही करायचे होते. मात्र त्यांचे कुटुंबीय लग्नाला नकार देतील त्यामुळे त्यातील एकीने लिंग बदल करण्याचे ठरवले. त्यासाठी त्या दोघींमध्ये मोठ्या असेलेल्या तरुणीने लिंग बदलासाठी घरच्यांची समजूत काढली. त्यानंतर लोकांकडून पैसे जमा केले. तब्बल दहा लाख खर्च करून तिने स्वत:वर लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून घेतली व तरुणीचं तरुणात रुपांतर झाले. त्यानंतर त्या दोघींनी लग्नही केले. मात्र त्या जोडप्यातील पत्नीच्या पालकांचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे त्यांनी लग्नानंतर जबरदस्ती तिला घरी घेऊन आले. त्यामुळे तिचा नवरा सैरभैर झाला. त्याच्या कुटुंबीयांनी व त्याने मुलीच्या पालकांना समजवायचा प्रयत्न केला मात्र त्यांनी काहीच ऐकले नाही. अखेर त्याने पोलिसात तक्रार केली. मात्र तिथे तर त्याला धक्काच बसला. ज्या मुलीसाठी त्याने लिंग बदलले त्या मुलीने त्याच्यासोबत राहण्यासच नकार दिला.
‘नवरा बायको दोघंही हे सज्ञान आहेत. नवऱ्याने त्यांच्या लग्नाचा फोटो आम्हाला दाखवला. पण बायकोने त्याच्यासोबत राहायला नकार दिला. आता तिला तिच्या कुटुंबासोबत राहायचे आहे. आम्ही मुलीच्या घरच्यांनी मुलीवर दबाव टाकलाय का याची देखील चौकशी करत आहोत’, अशी माहिती पोलीस निरीक्षक स्मिती चौधरी यांनी दिली आहे.



























































