
कथित आर्थिक अफरातफरीच्या आरोपामुळे अडचणीत सापडलेले माजी कॅबिनेट मंत्री आणि कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांची बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने आठ तास चौकशी केली. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याशी संबंधित कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने हसन मुश्रीफ यांना समन्स बजावले होते. तत्पूर्वी ईडीने मुश्रीफ यांना पुढील दोन आठवडे अटक करू नये, तसेच या अवधीत मुश्रीफ यांना अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात दाद मागण्यास मुभा आहे, असा निर्णय उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने दिला होता.
ईडीने गेल्या आठवड्यामध्ये हसन मुश्रीफ यांना समन्स बजावले होते. सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश ईडीने दिले होते. परंतु हसन मुश्रीफ ईडी चौकशीसाठी हजर झाले नाहीत. ईडीच्या या कारवाईला आव्हान देत मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर हसन मुश्रीफ बुधवारी दुपारच्या सुमारास ईडी कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले. ईडीने आठ तासांहून अधिक काळ त्यांची चौकशी केली. या चौकशीनंतर हसन मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
उच्च न्यायालयाने काल दिलासा दिल्यानंतर, आम्ही कालही चौकशीसाठी आलो होतो. ईडीने मला काल समन्स देऊन बुधवारी दुपारी साडेबारा वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. त्यामुळे साडेबारा वाजेपासून ते आतापर्यंत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत त्यांना सहकार्य केले. ईडीने पुन्हा सोमवारी साडेबारा वाजता चौकशीसाठी बोलावलं आहे, अशी प्रतिक्रिया मुश्रीफ यांनी दिली.
आठ तासाच्या चौकशीनंतरही तुमच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत नाही? तुम्ही आनंदी दिसत आहात असे विचारले असता ते म्हणाले की, मी काहीही चुकीचे केले नाही, त्यामुळे चौकशी अतिशय चांगली झाली. त्यांनी आम्हाला सहकार्य केले, आम्ही त्यांना सहकार्य केले.
View this post on Instagram
ते पुढे म्हणाले की, सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर चौकशी झाली. अनेक प्रश्न होते, त्यावर आता मी बोलणे योग्य नाही. आम्ही समाधानकारक उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. आता पुन्हा सोमवारी पुन्हा चौकशासाठी बोलावले आहे, आम्ही पुन्हा समाधनकारक उत्तरं देऊ.
View this post on Instagram



























































