हसन मुश्रीफ ठोकणार सोमय्यांवर 100 कोटींचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 127 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याचा आरोप केला. मात्र हसन मुश्रीफ यांनी या आरोपांना सडेतोड उत्तर दिले. मागील 17 वर्षांतील मंत्रीपदाच्या काळात माझ्यावर गैरव्यहाराचा एकही आरोप झालेला नाही. लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. सोमय्या यांना असे बेछुट आरोप करण्याची सवय असल्याचे सांगत त्यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची घोषणा हसन मुश्रीफ यांनी केली.

किरीट सोमय्या यांनी बेछुट आरोप केल्यानंतर राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीने कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले. आपल्यावर केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. मी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केलेला नाही, असे सांगत किरीट सोमय्या यांचा तीव्र शब्दांत निषेध केला.

17 वर्षांच्या मंत्रीपदात एकही आरोप नाही

“राजकारणात, समाजकारणात प्रतिमा तयार करण्यासाठी अनेक वर्षे घालवावी लागतात, कष्ट करावे लागतात. पण कोणीही यावे आणि डाग लावावा ही परिस्थिती आली. माझ्यावर आधीही असे आरोप झाले तेव्हा मी मानहानीचे दावे ठोकले आहेत. आता हा सातवा दावा. माझ्यावर लोकांचा विश्वास आहे. त्याला तडा जाऊ नये म्हणून हे मी करीत आहे. मी 17 वर्षे राज्यात मंत्री आहे. माझ्यावर एकही आरोप झालेला नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

बिचाऱ्या सोमय्यांना काही माहिती नाही

बिचाऱया किरीट सोमय्यांना काही माहिती नसावे. ते कोल्हापूरला आले असते तर त्यांना खरी परिस्थिती स्पष्टपणे समजली असती. सोमय्या यांच्यावर आपण दोन आठवडय़ांमध्ये 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले.

भाजपची प्रतिमा मलीन

किरीट सोमय्या यांच्या अशा वक्तव्यांमुळे भाजपची प्रतिमा मलीन होत आहे. निवडणुकीतील पराभवासाठीदेखील सोमय्याच जबाबदार असतील, “सोमय्यांनी माहिती घ्यावी. अन्यथा विनाकारण भाजपची प्रतिमा मलीन होईल, असा सल्ला मुश्रीफ यांनी दिला.

अशा प्रवृत्तीनेच भाजपा हद्दपार

अडीच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकांदरम्यान आपल्या घरावर आणि साखर कारखान्यावर छापा पडला. चौकशीनंतरही अद्याप त्यांना काहीही सिद्ध करता आलेले नाही. भाजपाच्या अशा प्रवृत्तीमुळेच जिह्यातून ते हद्दपार झाले आहेत. आताही तेच घडत आहे. जेव्हा असा नाहक त्रास दिला जातो, तेव्हा लोक चवताळून उठतात. भाजपच्या पराभवाला देखील सोमय्या हेच जबाबदार ठरतील. पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल, तेव्हा आपण स्वतः सोमय्यांना हार घालू, असा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला.

तीन महिन्यांत 100 कोटी उभारतो

साखर कारखान्यासाठी तीन महिन्यांत 100 कोटी रुपये जमा करून दाखवतो असे आव्हान हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्यांना दिले. मला माझ्या साखर कारखान्याचा विस्तार करायचा आहे. त्यासाठी 100 कोटी रुपये लागतील. 15 दिवसांत लोक 50 कोटी रुपये आणून देतील इतका लोकांचा विश्वास आपण संपादन केल्याचे मुश्रीफ म्हणाले.

काय केले आरोप

किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लॉण्डरिंग, बेनामी संपत्ती गोळा करणे व गैरव्यवहारचे आरोप केले आहेत.

मुश्रीफ यांनी 127 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे प्रथमदर्शनी दिसते आणि हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला.

या घोटाळ्यात त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांचा सहभाग असून त्याचे 2 हजार 700 पानांचे पुरावे आपण इन्कम टॅक्स विभागाकडे दिल्याचा दावा सोमय्या यांनी केला.

चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात एफआयआर

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजप सरकारमध्ये सार्वजनिक बांधका मंत्री असताना राज्यातील रस्ते बांधनीच्या कामात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला. यामुळे राज्यातील 90 टक्के रस्ते बंद असून कंत्राटदारच पळून गेले आहेत. त्यांनी हायब्रिड अॅम्युनिटी बांधकामात केलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन, अॅण्टीकरप्शनमध्ये त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार असल्याचा इशारा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना दिला.