
सामना ऑनलाईन । तेहरान
अमेरिकेने इराणवर लादलेले निर्बंध म्हणजे आर्थिक दहशतवाद असल्याचा आरोप इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी केला आहे. अमेरिकेने इराणवर बेकायदा आणि अन्यायपूर्ण निर्बंध लादले आहेत. हे निर्बंध म्हणजे दहशतवादाची घटना असल्याचे ते म्हणाले. इराणबरोबरच्या अणुसहकार्य करारातून बाहेर पडल्यावर 2015 मध्ये अमेरिकेने इराणवर निर्बंध लादले होते.
दहशतवाद आणि प्रांतिक सहयोगावर आयोजित एका संमलेनात त्यांनी हे आरोप केले आहेत. या संमेलनात अफगाणीस्तान,चीन, पाकिस्तान, रशिया आणि तुर्कीतील नेतेही सहभागी झाले होते. अमेरिका पूर्ण ताकतीनिशी आपच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. आमचे स्वातंत्र्य, स्वायतत्ता आणि आमची ओळख याच्यासाठी अमेरिकेचा मोठा धोका आहे. तसेच त्यामुळे इतर देशांशी असणाऱ्या आमच्या संबंधांमध्येही त्यामुळे बाधा येत असल्याचे रुहानी यांनी सांगितले. ज्या देशांना अमेरिकेच्या निर्बंधांचा सामना करावा लागला, त्यांचाही उल्लेख रुहानी यांनी केला. अमेरिकेच्या चीनशी असलेल्या व्यापार संघर्षामुळे सगळ्यांचेच नुकसान झाले. तुर्कीवरील निर्बंधामुळे अनेकांवर निर्बंध आले. अमेरिकेने रशियाला धमकी दिल्यावर आपली सुरक्षितता धोक्यात असल्याची जाणीव जगाला झाली, असेही ते म्हणाले.
आमच्यावर निर्बंध लादून त्यांनी इराणला आंतरराष्ट्रीय व्यापर, उर्जा, सुरक्षा आणि विकासापासून दूर केले आहे. या निर्बंधांमुळे त्यांनी सगळ्या जगावरच निर्बमध घातले आहेत. अमेरिकेने अणुसहकार्य करारापासून वेगळे होण्याच्या घेतलेल्या निर्णयावरही त्यांनी आक्षेप घेतला. अमेरिकेची अशी दादागिरी खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. अंमली पदार्थ आणि दहशतवादविरोधातील आमच्या मोहीमेला त्यांनी हादरा दिला आहे, असेही रुहानी यांनी सांगितले.

























































