
अनेकजण आपल्या स्वप्नातील घरासाठी गृहकर्ज घेतात. तर काही अडचणीसाठी किंवा दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पर्सनल लोन घेतले जाते. तर वाहान खरेदीसाठी वाहन कर्ज घेतले जाते. ग्राहकांच्या या गरजा ओळखून बँकाही ग्राहकांसाठी विविध कर्ज योजना जाहीर करतात. मात्र, कर्जावरील हप्ते बँका आरबीआयच्या रेपोदरावरून निश्चित करतात. आता देशातील पाच मोठ्या बँकांनी एमसीएलआरमध्ये वाढ करत कर्जाचे व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दणका बसला आहे. हे नवे व्याजदर 7 ऑगस्टपासून लागू झाले आहेत.
रिझर्व्ह बँकेने नुकत्याच झालेल्या बैठकीत रेपो रेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आरबीआयने तिसऱ्यांदा रेपो रेट स्थिर ठेवले असले तरी देशातील पाच मोठ्या बँकांना ग्राहकांना दणका देत कर्जावरील व्याजदर वाढवले आहेत. एचडीएफसी आणि कॅनरा बँकांसह पाच बँकांनी एमसीएलआरमध्ये वाढ करत कर्ज महाग केले आहे. कॅनरा बँकेने एका महिन्याच्या कर्जासाठी एमसीएलआर 8.5 टक्के, तीन महिन्यांसाठी 8.15 चक्के तर सहा महिन्यांसाठी 8.50 टक्के तर वर्षभरासाठी 8.70 टक्के केले आहे.
बँक ऑफ बडोदानेही एमसीएलआरमध्ये 5 बेसिक प्वॉइंटची वाढ केली आहे. त्यामुळे वर्षभरासाठीच्या कर्जावर व्याजर वाढून ते 8 टक्के झाले आहेत. एचडीएफसी बँकेनेही मुदतीच्या कर्जावर 15 बेसिक प्वॉइंटची वाढ केली आहे. आयसीआयसीआय बँकेनेही मुदतीच्या कर्जावर 5 बेसिक प्वॉइंटची वाढ केली आहे. या वाढीनंतर आयसीआयसीआय बँकेचे वर्षभराच्या कर्जावर 8.40 टक्के तीन महिन्याच्या कर्जावर 8.45 टक्के तर सहा महिन्यांच्या कर्जावर 8.8 टक्के व्याजदर झाले आहेत.
बँक ऑफ इंडियानेही एमसीएलआरमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे वर्षभरासाठीच्या कर्जावर 8.70 टक्के व्याजदर झाले आहेत. आरबीआयने रेपो रेट 6.5 टक्के स्थिर ठेवला आहे. या व्याजरानुसार आरबीआय बँकांना कर्ज देते. आरबीआयने रेपो रेट स्थिर ठेवला असला तरी पाच मोठ्या बँकांनी कर्ज महाग करत ग्राहकांना दणका दिला आहे.



























































