
मोबाईल हा आपल्या जीवनाचा जणू एक अविभाज्य भागच बनून गेलाय. काहीजण तर गाडी चालवताना किंवा रस्त्यावरून चालत जाताना मोबाईलवर बोलत राहतात. अगदी समोर खड्डा किंवा खांब आला तरी मोबाईलच्या नादात समजत नाही. त्यामुळे अपघात होतात. ही समस्या सोडवण्यासाठी गुगलने पुढाकार घेतलाय. गुगलच्या डिजिटल वेलबिइंग ऑप्लिकेशनमध्ये ‘हेड्स अप’ हे नवे फीचर उपलब्ध करून दिले जाणार आहे.
चालताना एखाद्या युजर्सच्या हातात मोबाईल असेल तर गुगलकडून ‘हेड्स अप’ म्हणजेच डोके वर करून पुढे पहा, असा संदेश देऊन सावध केले जाणार आहे. गेल्या महिन्यात या नव्या फीचरबद्दलची माहिती एक्सडीए डेव्हेलोपर्समध्ये प्रसिद्ध झाली होती. ‘तुम्ही चालताना फोन वापरत असाल तर तुमच्या आजूबाजूला काय चाललंय, याकडे लक्ष देण्यासाठीचा रिमाइंडर मिळवा. सावध व्हा,’ असे ‘हेड्स अप’च्या सेटअप स्क्रीनवर लिहिलेले आहे.




























































