रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘या’ पदार्थांचा अतिवापर धोकादायक…जाणून घ्या…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संक्रमणापासून बचाव होण्यासाठी प्रत्येकजण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे काढे आणि औषधांची विक्री वाढली आहे. काहीजण वैद्यकीय सल्ल्याशिवाय विटामीनच्या गोळ्या घेत आहेत. तर काहीजण घरगुती काढा आणि मसाल्यांचा वापर करत आहेत. मात्र, वैद्यकीय सल्ल्यानुसार आणि योग्य प्रमाणात काढा किंवा औषधे घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरगुती काढ्याच्या आतिवापराने आरोग्याच्या इतर तक्रारी निर्माण होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घरगुती काढ्याचा अतिवापर त्यातील पदार्थांचे चुकलेले प्रमाण यामुळे येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येत वाढ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यात पोटाच्या तक्रारी असल्याचे रुग्ण जास्त आहेत. तर काहींना काढ्यातील पदार्थांच्या अयोग्य प्रमाणाने उष्णतेचे विकार झाले आहेत. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय करताना त्यातील पदार्थांचे योग्य प्रमाण जाणून घ्यावे. तसेच कोणतेही औषधे काढे कायमस्वरुपी घेऊ नये. त्याच्या अतिवापराने दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

हळद ही गुणकारी आहे. मात्र, कच्ची हळद (हळकुंड) वापरत असल्यास तीन आठवड्यात त्याचा वापर करावा. तसेच काळ्या मिरीसोबत याचे सेवन केल्यास फायदा होतो. दिवसभरात तीन ग्रॅम म्हणजे अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त हळद घेऊ नये. पोटात त्रास होत असेल किंवा पोटदुखी होत असल्यास हळदीचा वापर थांबवावा. आले पचनशक्ती सुधारण्यास उपयोगी आहे. तसेच आल्याचा चहातही वापर करण्यात येतो. आल्याचा रस लिंबाच्या रसासोबत घेतल्यास त्याचा चांगला फयदा दिसून येतो. मात्र, गॅसचा त्रास होत असल्यास आल्याचा वापर थांबवावा. तसेच दिवसभरात 10 एमएलपेक्षा जास्त म्हणजे दोन चमच्यापेक्षा जास्त आल्याचा रस घेऊ नये.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काळ्या मिरीचा वापर होतो. तसेच फुफ्फुसांच्या मजबुतीसाठीही काळीमिरी उपयोग असते. मात्र, अॅसिडीटी, उष्णेतेचे विकार, जळजळ, गॅस यासारखे त्रास होत असल्यास काळ्या मिरीचा वापर टाळावा. काळ्या मिरीने उष्णतेचे विकार वाढत असल्याने त्याचा वापर जपून करावा. दिवसातून चार ग्रॅम म्हणजे अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त मिरी घेऊ नये. लसूणाचा आहारात समावेश असतो. त्यामुळे पचनाला मदत होते. मात्र, तोंडाला दुर्गंधी येत असल्यास आणि अशक्तपणा वाटत असल्यास लसूण टाळावे. दिवसभरात सात ग्रॅमपेक्षा जास्त म्हणजे एक चमच्यापेक्षा जास्त लसून पेस्ट वापरू नये. याची पावडर वापरत असल्यास चिमूटभर वापरावी.

पोट साफ होण्यासाठी अनेकजण धणे-जिरे एकत्र घेतात. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासही याचा उपयोग होतो. मात्र, रक्तदाबाचा त्रास असल्यास याचा वापर टाळावा. तसेच दिवसाला अर्ध्या चमचा धणे जिरे यांचे मिश्रण वापरावे. मधुमेह असलेले अनेकजण मेथी दाण्यांचा वापर करतात. रिकाम्यापोटी मेथीचे पाणी पिण्याचेही अनेक फायदे आहेत. मात्र, पोटाचे काही विकार असल्यास मेथीचा वापर टाळावा. तसेच दिवसाला एक चमच्यापेक्षा जास्त मेथी दाण्यांचा वापर करू नये. कोणत्याही पदार्थांचा अतिवापर शरीराला हानीकारक असतो. त्यामुळे कणतेही पदार्थ, काढा, औषधे घेण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा. त्याचे योग्य प्रमाण आणि किती काळ घ्यायचा आहे, याची माहिती घेऊनच त्याचा वापर करावा.