
देशातील कोरोनाची लाट ओसरत असल्याचे दिसत असताना देशातील 18 जिल्ह्यांनी चिंता वाढवली आहे. या 18 जिल्ह्यांमध्ये एकूण रुग्णसंख्येच्या 47.5 टक्के रुग्ण आढळत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. अजूनही दुसरी लाट ओसरली नसून धोका कायम आहे. त्यामुळे जनतेने काळजी घेत कोरोनाच्या निर्देशांचे पालन करावे, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.
देशभरात कोरोनाच्या संक्रमणात घट दिसून येत आहे. दररोज 100 पेक्षा जास्त रुग्ण आढळणाऱ्या जिल्ह्यांची संख्या कमी झाली आहे. 1 जूनला देशात 279 जिल्ह्यांमध्ये 100 पेक्षा जास्त रुग्ण आढळत होते. आता त्या जिल्ह्यांची संख्या 57 वर आली आहे. 222 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या घटली आहे. आता 57 जिल्ह्यांमध्ये 100 पेक्षा जास्त रुग्ण आढळत असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. आता ठराविक भागातच संक्रमण वाढत आहे.
देशातील 18 जिल्ह्यात संक्रमणाचे प्रमाण जास्त असल्याने चिंता वाढली आहे. त्यात केरळच्या 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. या 18 जिल्ह्यातील रुग्णसंख्या 47.5 टक्के आहे. तर 44 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. संक्रमणाचे प्रमाण जास्त असलेल्यांमध्ये केरळ,मणीपूर,मिझोराम आणि नागालँडमध्ये आहेत. केरळच्या 10 जिल्ह्यात, महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यात आणि मणीपूरच्या 2 जिल्ह्यात संक्रमणाचे प्रमाण जास्त आहे.
हिमाचल प्रदेशात कोरोनाच्या संक्रमणात वाढ झाली आहे. तेथे एका रुग्णापासून चार जणांना कोरोनाचे संक्रमण होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशातही कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमणात वाढली आहे. जगातील अनेक देशात कोरोना संक्रमण वाढत आहे. देशातही कोरोनाची दुसरी लाट अजून पूर्णपणे ओसरलेली नाही. त्यामुळे जनतेने काळजी घ्यावी, असे अग्रवाल यांनी सांगितले.




























































