अधिक तास काम केल्याने वाढतो हृदयविकाराचा धोका, डब्ल्यूएचओचा सतर्कतेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) च्या अहवालानुसार, अधिक तास काम केल्याने हृदय रोग आणि स्ट्रोकचा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतो. यामुळे जगभरात कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला असल्याचे डब्ल्यूएचओने सांगितले आहे.

एन्व्हायर्नमेंटल इंटरनेशनलमध्ये प्रसिद्ध झालेल्या डब्ल्यूएचओ आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (आयएलओ) च्या अभ्यासानुसार, 2016 मध्ये दिवसातील बरेच तास काम केल्यामुळे 7,45,000 लोक स्ट्रोक आणि हृदयरोगाने मरण पावले आहेत. ही आकडेवारीत आता 29 टक्क्यांनी वाढली आहे. डब्ल्यूएचओने गेल्या महिन्यात हा अहवाल प्रसिद्ध केला होता.

कोरोना आजारामुळे बहुतेक लोकं गेल्या एक वर्षापासून वर्क फ्रॉम होम करत आहेत. घरातूनच काम करत असल्याने लोकांचा स्क्रीन टाईम वाढला आहे. डब्ल्यूएचओ आणि आयएलओच्या अहवालानुसार, कामावरील तणावाचा पुरुषांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. दर आठवड्यात 55 तास किंवा त्याहून अधिक काम करणारे 45 ते 74 वर्षे वयोगटातील पुरुषांमध्ये मृत्यूची संख्या 72% पर्यंत आहे.

अधिक वेळ काम केल्याचा परिणाम मानसिकदृष्ट्याही पडत असल्याचे दिसून येत आहे. कामाच्या ताणामुळे बरेच लोक डिप्रेशनला देखील बळी पडत आहेत. मोहाली येथील फोर्टिस हॉस्पिटल कार्डिओलॉजीचे संचालक आणि एचओडी डॉ. आर के जसवाल यांनी सांगितले की, ‘नोकरीची अनिश्चितता आणि कामाच्या दीर्घ वेळेमुळे लोकांमध्ये तणाव वाढत आहे. कालांतराने कामाचे तास वाढल्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. विशेषत: अशा लोकांमध्ये जे धूम्रपान करतात आणि व्यायाम करीत नाहीत.’

सद्य परिस्थितीत साथीचे आजार रोखण्यासाठी घरातून काम करणे प्रत्येकाची गरज बनली आहे. अशातच आरोग्य तज्ञ लोकांना कामामधून वेळ कडून स्वतःकडे लक्ष देण्याचा सल्ला देतात. स्ट्रोक आणि हृदयरोग टाळण्यासाठी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल अवलंबणे महत्वाचे आहे.