
निरोगी आयुष्यासाठी शांत आणि पुरेशी झोप अत्यंत आवश्यक आहे. मात्र अनेक जण झोपण्यापूर्वी काही चुकीच्या सवयी लावून घेतात, ज्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. तज्ज्ञांच्या मते, झोपण्याआधी मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉपचा अतिवापर केल्याने मेंदू सतत सक्रिय राहतो आणि झोपेचे चक्र बिघडते.
झोपण्याच्या किमान अर्धा तास आधी स्क्रीनपासून दूर राहणे गरजेचे आहे. तसेच रात्री उशिरा जड, तेलकट किंवा मसालेदार अन्न खाल्ल्यास अपचन, अॅसिडिटी आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते. चहा, कॉफी यांसारखी कॅफिनयुक्त पेयेही झोप उडवतात. त्यामुळे रात्री हलके आणि पचायला सोपे अन्न घेण्याचा सल्ला दिला जातो. झोपण्यापूर्वी अशा पदार्थांचे सेवन टाळल्यास झोप अधिक शांत आणि गाढ लागते.
याशिवाय झोपण्याआधी तणावपूर्ण चर्चा, नकारात्मक विचार किंवा कामाचा ताण घेणेही टाळावे. मन शांत ठेवण्यासाठी शांत संगीत, वाचन किंवा ध्यान-प्राणायाम यांचा अवलंब करणे फायदेशीर ठरते. नियमित वेळेला झोपण्याची सवय लावल्यास शरीराचे जैविक घड्याळ संतुलित राहते आणि आरोग्य चांगले राहते.
























































