शिळे पदार्थही आरोग्यदायी!

530

>> शमिका कुलकर्णी, आहारतज्ञ 

आदल्या रात्रीचा उरलेला भात किंवा पोळ्या यांचे सकाळी काय करायचे हा बहुतेक घरांतील गृहिणींना पडलेला प्रश्न. फोडणीचा भात किंवा फोडणीची पोळी हे नेहमीचेच पदार्थ. पण खूप वेळा शिळा भात किंवा पोळी घरातील सहायकांना देण्यात येते किंवा टाकून दिली जाते. पण हे दोन्ही पदार्थ शिळे जरी झाले तरी त्यात बरेच आरोग्यदायी घटक असतात. या दोन्हींचे अनेक स्वादिष्ट पदार्थ करता येतात.

शिळा भात का खावा?

 • भातात भरपूर ऊर्जा असते. तो सकाळी न्याहरीला खाल्ल्यास तो आरोग्यदायी ठरतो.
 • शिळा भात मातीच्या भांड्यात दही दुधात भिजत घालून रात्रभर ठेवल्याने त्या भातातील जीवनसत्त्वे व खनिजे यांच्यात वाढ होते. मातीच्या भांड्यात ठेवल्याने भातातील पोषक तत्त्वे शरीराला मिळतात. शरीरात थंडावा निर्माण होतो.
 • रात्री भिजत घातलेल्या भातात उपयुक्त जीवाणू तयार होतात व ते आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.
 • या भातात लोह, कॅल्शियमचे प्रमाण वाढते.
 • भातात ग्लुटेन नसल्याने तो ग्लुटेन फ्री आहे. त्यामुळे ग्लुटेनमुळे त्रास होणार्‍यांनी याचा समावेश आहारात करावा.
 • शिळ्या भाताचा वापर दुसर्‍या दिवशी न्याहरीमध्ये करायला हरकत नाही. अशा वेळी फोडणीचा भात, गोड केशरी भात किंवा थालीपीठ करावे.
 • जे लोक सकाळच्या वेळी शिळ्या भाताचे सेवन करतात त्यांना बद्धकोष्ठतेची समस्या होत नाही. कारण भातामध्ये फायबर जास्त असते यामुळे बद्धकोष्ठतेपासून सुटका देण्यास मदत होते.
 • शिळ्या भाताचे सेवन केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळून दिवसभर उत्साह वाढतो.
 • शिळा भात अल्सरचे घाव लवकर बरे करतो. कारण या भातात घाव अल्सर बरा करण्याचे गुणधर्म आहेत. अल्सरचा आजार असल्यास आठवड्यातून तीन वेळा शिळा भात खाल्ला तर अल्सर बरा होऊ शकतो.
 • पोळी : शिळी पोळी उरल्यास त्याचा वापर आवर्जून दुसर्‍या दिवशीच्या न्याहारीत करावा. पोळीतील पोषक तत्त्वे व जीवनसत्त्वे शरीराला उपयुक्त असतात व पोळी खाल्ल्याने जेवणाचे समाधान मिळते.
 • पोळीमध्ये उपयुक्त कर्बोदके असतात. त्याचबरोबर तंतूमय पदार्थांचाही समावेश असतो. थोड्या प्रमाणात ग्लुटेन प्रथिने असतात. त्यामुळे पोळीचे शरीराला अनेक फायदे होतात.
 • उपयुक्त कर्बोदके व तंतूमय पदार्थ असल्याने वजन कमी करण्यास मदत होते. त्याचबरोबर रक्तातील साखर व कोलेस्टेरॉल यांचे नियंत्रण होण्यास मदत होते.
 • तंतूमय पदार्थ बद्धकोष्ठाचा त्रास कमी करण्यास, त्याचबरोबर वजन कमी करण्यास मदत होते.
 • न्याहरीत पोळी खाल्ल्याने दिवसाची सुरुवात ऊर्जादायी होते व खाल्ल्याचे समाधान मिळते.
 • न्याहरीत तयार पदार्थांपेक्षा जसे कॉर्नफ्लेक्स, मुसली किंवा इतर पदार्थांपेक्षा शिळी पोळी खाणे आरोग्याला अधिक गुणकारी ठरते. म्हणून शिळ्या पोळीचा उपयोग नक्कीच केला पाहिजे.

 

शिळ्या पोळीचे करायचे काय?

शिळ्या पोळ्यांचे अनेक चविष्ट पदार्थ बनतात जसे फोडणीची पोळी, पोळीचा तूप साखर घालून लाडू, भाज्या घालून फ्रँकी, पोळीला गूळ व तूप लावून रोल केल्याने ऊर्जादायी प्रकार तयार होतो.

भाताचे कटलेट

साहित्य : एक वाटी भात, 2 उकडलेले बटाटे, 1/2 वाटी ब्रेड चुरा, कोथिंबीर, मीठ, थोडे कॉर्नफ्लॉवर, धने-जिरे पूड, तिखट, हळद, गरम मसाला, तेल.

कृती : सर्व साहित्य एकत्र करावे आणि त्याचे कटलेटचे आकार करून ब्रेडच्या चुर्‍यात घोळवावे. मग हे कटलेट तव्यावर शॅलो फ्राय करावे व टोमॅटो सॉसबरोबर खावेत.

शिळ्या पोळीची फ्रँकी

साहित्य : 2 पोळ्या, 2 कप मिश्र भाज्या – कोबी, गाजर, कांदा, सिमला मिरची किंवा आवडीच्या भाज्या. 1 चमचा टोमॅटो सॉस, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा चिली सॉस, 1 चमचा मटार, 1 चमचा चीज, मीठ.

कृती: कढईत तेल तापत ठेवून कांद्यावर मिश्र भाज्या परताव्यात. त्यात सॉस घालून चवीप्रमाणे मीठ घालावे. दोन पोळ्या एकावर एक ठेवून त्यात भाजी भरावी. वाटल्यास थोडे चीज घालावे. तव्यावर बटर घेऊन हलक्या गुलाबी होईपर्यंत शेकाव्यात. टोमॅटो सॉसबरोबर खाव्यात.

आपली प्रतिक्रिया द्या