
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी ईडीच्या वतीने अॅड. अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला. वेळेअभावी त्यांचा युक्तिवाद पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणी 17 ऑक्टोबरला घेण्याचे निश्चित केले. मागील सुनावणीदरम्यान संजय राऊत यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी जामिनासाठी युक्तिवाद केला होता. त्यावर सोमवारी सरकारी वकील अनिल सिंग यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यापुढे ईडीची बाजू मांडली. दरम्यान, ईडीला पुढील सुनावणीत युक्तिवाद पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. ईडीचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर दुसऱयाच दिवशी आम्ही आमची बाजू मांडू, असे खासदार संजय राऊत यांचे वकील अॅड. अशोक मुंदरगी यांनी न्यायालयाला सांगितले.





























































