मुंबईची होरपळ; पारा 35 अंशांपुढेच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला होळीच्या आधीच वैशाख वणव्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. गेल्या आठवडय़ात 38.1 अंशांची विक्रमी पातळी गाठणाऱया पाऱयाने सोमवारी सलग दुसऱया दिवशी 35 अंशांच्या पुढे उसळी घेतली. शहरात पुढील संपूर्ण आठवडाभर तापमान 35 ते 37 अंशांच्याच आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सोमवारी चेंबूरमध्ये 36.2 अंश तापमानाची नोंद झाली.

हवामान खात्याच्या नोंदीनुसार, रविवारी सांताक्रूझमध्ये 35.6 अंश कमाल तापमान नोंद झाले होते. सोमवारी सकाळी किमान तापमानातील घसरणीमुळे मुंबईकरांना उकाडय़ापासून थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र दुपारी 12 वाजल्यानंतर पार्याने पुन्हा 35 अंशांच्या पातळीवर उसळी घेतली.

सांताक्रूझमध्ये कमाल तापमानात सरासरीपेक्षा 3 अंशांची वाढ झाली. चेंबूरमध्ये 36.2, बोरिवलीत 35.9, मुलुंडमध्ये 35.5 आणि पवईत 33.7 अंश इतके कमाल तापमान नोंद झाले. मुंबई आणि शेजारच्या ठाणे जिह्यात सुर्य जणू आग ओकू लागल्यामुळे नागरिकांची प्रचंड लाहीलाही होत आहे.