
सामना प्रतिनिधी, मुंबई
मुंबईसह संपूर्ण राज्यभरात आग ओकणाऱया सूर्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही मुष्कील झाले आहे. अमरावती, चंद्रपूर, वर्ध्यात पारा 46 अंशांवर तर नगरसह कोल्हापूर, नाशिक, पुण्यासारख्या शहरात पाऱयाने 40 ते 45 अंशांवर झेप घेतल्याने नागरिकांचा घामटा निघाला. अकोल्यात उष्माघाताने एकाचा मृत्यू झाला असून विदर्भात रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत तापमान 34 अंश असताना वातावरणातील आर्द्रता वाढल्याने 38 ते 40 अंश तापमानाइतका उकाडा निर्माण झाला आहे.
या वर्षी अनेक शहरांत मार्चमध्येच चाळिशी ओलांडलेल्या पाऱयाने अद्याप खाली येण्याचे नाव घेतलेले नाही. त्यामुळे प्रचंड उकाडय़ाने नागरिक हैराण होत आहेत. सकाळपासूनच सूर्य आग ओकत असून दुपारी तर रस्ते अक्षरशः ओस पडत आहेत. माणसांसह पशुपक्ष्यांना चक्कर येणे, उष्माघात होत आहे. मुंबईसह गोव्यापर्यंत किनारपट्टी भागात पश्चिमेकडून अरबी समुद्रातून येणाऱया बाष्पयुक्त वाऱयांमुळे तापमान 34-35 अंश असताना उकाडा मात्र 40 अंश तापमान असल्याइतका जाणवत आहे. मुंबईसह किनारपट्टी भागात ही स्थिती मान्सून सक्रिय होईपर्यंत राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केल्यामुळे मुंबईकरांना पावसाळ्यापर्यंत प्रचंड उकाडय़ाचा त्रास सहन करावा लागणार आहे.
…म्हणूनच मुंबई तव्यावर
समुद्राला लागून असलेल्या मुंबईची आर्द्रता ही सरासरी 50 टक्क्यांपेक्षा कमी असते, मात्र मार्चअखेर अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे ही आर्द्रता वाढत जाऊन 95 टक्क्यांवर पोहचत आहे. सध्याच्या दिवसांत आर्द्रतेची सरासरी 60 टक्के आहे. प्रतिवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत ही स्थिती निर्माण होत असल्याचे मुंबई हवामान विभागाचे कृष्णानंद होशाळीकर यांनी सांगितले.
काही शहरांचे तापमान
शहर कमाल किमान
मुंबई 34 27
अकोला 46.7 28
चंद्रपूर 46 31
अमरावती 46 26
वर्धा 46 26
नगर 45 29
कोल्हापूर 41 25
सोलापूर 44 30
नाशिक 42 29
पुणे 43 26



























































