Heatstroke – मुंबईकरांवर उष्माघात, भोवळ, उलटय़ा आणि जुलाब… आठ टक्के रुग्ण वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘एप्रिल महिन्यात ही स्थिती… अजून मे महिना जायचा आहे. काय होणार देव जाणे!’ असे हाशहुश्श करत घामाने ओलाचिंब झालेला रुमाल पिळणारे मुंबईकर आता जागोजागी दिसू लागले आहेत. मुंबईतच नव्हे तर संपूर्ण राज्यातच ही स्थिती आहे. सूर्य जणू आग ओकत आहे. म्हणूनच आरोग्य विभाग ऍलर्ट मोडवर असून राज्यभरातील सरकारी, खासगी रुग्णालयांना दक्षतेचे आदेश रवाना झाले आहेत. काहिलीच्या दिवसांत तृषार्त बातमी एवढीच आहे की यंदा 99 टक्के पाऊस पडेल असा ‘पहिला’ अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. अर्थात आनंदधारा यंदा तरी किमान लवकर कोसळू दे, अशीच विनंती सर्व करत आहेत हे खरे!

पाऱयाने चाळिशी पार केली

दरवर्षी राज्याच्या तापमानात वाढ असून यंदा पारा 40 डिग्री पार गेल्याने राज्यभरात उष्णतेची लाट आली आहे. 100 हून अधिक लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून सर्व महापालिका, नगरपालिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे जिल्हानिहाय समन्वय समित्या नेमण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना देण्यात आल्या असून उष्माघात कृती आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे. राज्यातील या उन्हाळी स्थितीवर आरोग्य विभागाचे लक्ष असल्याचेही व्यास यांनी सांगितले.

उष्माघाताचे प्रमाण वाढले असून राज्यात आतापर्यंत 11 जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

n धाराशीव 1
n हिंगोली 1
n जालना 1
n संभाजीनगर 1
n जळगाव 3
n अकोला 1
n अमरावती 1
n हिंगोली 1
n नागपूर 2

प्रतिबंधात्मक उपाय

n उष्मा वाढला की सतत पाणी पिणे आवश्यक आहे. एक ग्लास पाण्यात एक चमचा साखर व चिमूटभर मीठ टाकून केलेले पेय यासाठी उत्तम असते, मात्र अतिसाखरयुक्त सरबत टाळा. n हलक्या रंगाचे, सैल व सुती कपडे घाला. n उन्हात जाताना गॉगल, टोपी, छत्री वापरा. n घाम अंगावर सुकू देऊ नका. n कपाळावर थंड पाण्याच्या पट्टय़ा, आइस पॅक ठेवणे. n दिवसभरात 5 ते 6 लिटर ओआरएसचे पाणी द्यावे. n सकाळी 11 ते दुपारी तीन या वेळेत उन्हात कष्टाचे काम करू नका, व्यायाम करणे टाळा. n डोक्यावर जाड कापड गुंडाळा. अधूनमधून सावलीत जा.

उपचार काय करावेत?

उष्माघातामुळे किंवा अतिउन्हामुळे चक्कर आल्यास त्याला सावलीत आणावे. मोकळी हवा पोहोचू द्यावी. ताप वाढत असल्यास गार पाण्याने अंग पुसावे. तहान लागल्यासारखे वाटत नसले तरी पाणी, नारळ पाणी थोडय़ा थोडय़ा वेळाने घोट घोट प्यावे. यामुळे अनेकदा बरे वाटते. शरीराचे तापमान 104 फॅरनहाइट किंवा 40 अंश से.पेक्षा वाढले की स्नायू, मूत्रपिंड, मेंदू किंवा हृदयावर परिणाम होण्यास सुरुवात होते. त्यामुळे मूत्राचा रंग गडद पिवळा झाला, डोकेदुखी वाढली किंवा भोवळ आली तर तातडीने जवळच्या रुग्णालयात जा. उन्हाळय़ात चहा, कॉफी ही पेय शक्यतो टाळावीत. कोणत्याही स्वरूपातील मद्य टाळावे. अतिथंड पाणी, सरबत टाळावे. त्यामुळे पोटात मुरडा पडतो.

उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयांत स्वतंत्र वॉर्ड तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

उष्म्याचा त्रास लोकांना अधिक जाणवू लागल्याने, विशेषतः विदर्भ-मराठवाडय़ात उष्माघातामुळे मृत्यूचे प्रमाण वाढू लागल्याने उष्माघात कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.
याअंतर्गत नागरिकांचे उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्यात येत असून तशा सूचना महापालिका, नगरपालिकांनाही देण्यात आल्या आहेत.
उष्माघाताची परिस्थिती हाताळण्यासाठी नोडल अधिकारी नेमण्यात येणार आहे.

सरकारी रुग्णालयांत गर्दी

मुंबईतील तापमानातही मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच तापमानाबरोबरच आर्द्रतेचे प्रमाणही अधिक असल्याने शरीरातील घाम अतिरिक्त प्रमाणात जाऊन मुंबईकरांना त्रास जाणवत आहे. यामुळे भोवळ, उलटय़ा तसेच जुलाब यासारखे त्रास मुंबईकरांना जाणवू लागल्याची माहिती जे. जे. रुग्णालयाच्या मेडिसिन विभागाचे पथकप्रमुख डॉ. मधुकर गायकवाड यांनी दिली. 7 ते 8 टक्के रुग्ण हे उष्म्याच्या त्रासामुळे रुग्णालयात येत असल्याचे डॉ. गायकवाड म्हणाले.