28 सप्टेंबरपर्यंत वादळी पावसाचा इशारा, मराठवाड्यात हाहाकार; बीडमध्ये ढगफुटीसारखी परिस्थिती…

गेली कित्येक वर्षे मराठवाडय़ाकडे वक्रदृष्टी करणाऱया पावसाने यंदा मात्र अतिवृष्टीचा कहरच केला आहे. रविवारीही बीड, धाराशीव, लातूरसह संपूर्ण मराठवाडय़ालाच पावसाने जबर तडाखा दिला. दरम्यान, मराठवाडय़ाला 28 सप्टेंबरपर्यंत वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल्याने संकट कायम आहे.

राशिव जिल्हय़ात तर चार तासांत 200 मिमी पावसाची नोंद झाली. भूम-परांडा तालुक्यात पुराच्या मगरमिठीत सापडलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टरला पाचारण करावे लागले. भूम तालुक्यातील चिंचोली येथे मध्यरात्रीच्या सुमारास अचानक पुराचा लोंढा आला. त्यात देवांगनाबाई नवनाथ वारे (75) या वृद्धेच्या घरात पाणी घुसले. त्यांना बाहेरच येता आले नाही, पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. जालन्यातही विरेगाव येथे पुरात अडकलेल्या ग्रामस्थांना एनडीआरएफच्या पथकाने सुरक्षित स्थळी हलवले. बीड जिल्हय़ात शिरूर कासारला कोपलेल्या सिंदफणेने वेढा घातला. घराघरात पुराचे पाणी घुसले. शेवटी लोकांना जीव वाचवण्यासाठी घराच्या छतावर आसरा घेण्याची वेळ आली. या ठिकाणी भरणारा आठवडी बाजारही पावसाने उठवला. पावसाचा जोर एवढा होता की चौसाळय़ाजवळ धुळे-सोलापूर महामार्गावर तब्बल दोन किमीचा अवाढव्य जलाशय तयार झाला. महामार्गाच्या एका लेनवर दीड फूट पाणी साचल्याने वाहतूक थांबवावी लागली. पाण्याची आवक मोठय़ा प्रमाणावर होत असल्यामुळे जायकवाडी, माजलगाव, मांजरा, तेरणा, लोअर दुधना, कल्याण आदी प्रकल्पांचे दरवाजे आणखी वर उचलून नदीपात्रात विसर्ग करण्यात आ

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प; रस्त्यावरच साचले तळे; चौसाळ्याजवळची घटना

बीड ः मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. नदी-नाले खचाखच भरून वाहत आहेत. शेतात गुडघ्याएवढे पाणी आहे. त्यापेक्षाही थक्क करणारी बाब म्हणजे महामार्गावरील रस्त्यावर तळे साचले आहे. धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर चौसाळय़ाजवळ दोन कि.मी.अंतर एक लेन पूर्णपणे पाण्याने भरली आहे. त्या लेनवरून वाहतूक थांबविण्यात आली आहे. रस्त्यावर गुडघ्यापेक्षा जास्त पाणी झाल्याने दुसऱया लेनने वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. हे पाणी आडून राहिले आहे. अजून किती तास साचलेले पाणी बाहेर पडेल याचा अंदाज सांगता येत नसल्याने वाहतूक काही प्रमाणामध्ये ठप्प झाली आहे.