गोव्यात हवामान खात्याचा मुसळधारचा इशारा; पावसामुळे जनजीवन विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पणजी

गोव्यात सोमवारपर्यंत मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडेल,असा अंदाज पणजी वेधशाळेने वर्तवला आहे. शनिवारी सकाळ पासून राज्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे.

पणजी वेधशाळेने गोव्यात शनिवार 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आज सकाळपासून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी सखल भागात घरात पाणी शिरल्याचे चित्र पहायला मिळाले. राजधानी पणजी मधील मळा भागात भरती वेळी कॉर्तिन खाडी मधील पाणी सखल भागातील घरात शिरल्याने लोकांना बराच त्रास सहन करावा लागला.पणजी मधील पाटो भागात सेंट्रल लायब्ररी जवळ साचलेल्या पाण्यामुळे परिसराला तळ्याचे स्वरूप आले होते.सतत सुरु असलेल्या पावसामुळे अंजूणे धरण भरले असून खबरदारीचा उपाय म्हणून जलस्त्रोत खत्याने धरणाचे 1 आणि 4 नंबरचे दरवाजे उघडून पाणी सोडले आहे.साखळी आणि डिचोली मध्ये नद्यांच्या पाण्याच्या पातळी वर आप्तकालीन व्यवस्थापन विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे.