नगरमध्ये जोरदार पाऊस, नागरिकांची दाणादाण

560

नगर शहरात सायंकाळनंतर जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वत्र पाणी पाणी झाले होते. अनेक ठिकाणी वाहने अडकून पडण्याचे प्रकार सुद्धा घडले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत नगर शहरासह ग्रामीण भागांमध्ये सुद्धा पाऊस सुरू होता.

हवामान खात्याने पुढील चार दिवस पाऊस पडणार असे सांगितले होते, नगर शहरामध्ये सलग दोन दिवस पावसाने जोरदारपणे हजेरी लावली होती. आज दुपारपर्यंत पावसाने उघडीप दिली होती, मात्र सायंकाळनंतर नगर शहरासह सावेडी, केडगाव, एमआयडीसी परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. नगर शहरामध्ये तब्बल दीड तास पाऊस सुरू आहे त्यामुळे सर्व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहताना दिसत आहे.  दिवाळीची लगबग सुरू झाली असताना दुसरीकडे पाऊस थांबायला तयार नाही त्यामुळे सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली आहे

आज शहरांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी वाहने अडकून पडल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर मोठे खड्डे असल्यामुळे वाहने चालवणे सुद्धा अवघड झाले आहे. अनेकांनी कसाबसा मार्ग काढून वाहने पुढे नेले आहेत.  सलग पडलेल्या या पावसामुळे नगर शहरातील दिल्लीगेट, नालेगाव, माळीवाडा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहताना दिसत होते.

आपली प्रतिक्रिया द्या