देवगडमध्ये पावसाचा धुमाकूळ; वेळवाडीत एका घराचे छप्पर कोसळले

देवगडमध्ये शनिवारपासून पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. पावसाने आतापर्यंत 150 मिमीचा टप्पा ओलांडला असून रविवारी सकाळी 158 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे वेळ वाडी येथील राजन दहीबावकर यांच्या घराच्या छपराचा काही भाग कोसळला. घटनेची माहिती मिळताच युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,उपतालकप्रमुख बुवा तारी यांनी वेळवाडी येथील दहिबावकर यांच्या निवासस्थानी सोमवारी जात घराची पाहणी केली. यामध्ये दहिबावकर यांच्या छपराचा काही भाग कोसळून मोठे नुकसान झाले आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तूही भिजल्या आहेत.

रविवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू होता. त्याचवेळी अचानक घराच्या छपराचा काही भाग कोसळला. दैव बलवत्तर असल्यामुळे घरातील कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, दहिबावकर यांचे मोठे नुकसान झाले आहे.