तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये गुरुवारी दुपारी अतिवृष्टी झाली. या पावसाने अग्रणी, येरळा नदीसह ओढे व नाल्यांना पूर आले. या अतिवृष्टीने पूर्व भागातील अनेक पूल पाण्याखाली गेल्याने रात्री उशिरापर्यंत वाहतूक व्यवस्था बंद होती. या पावसाने शेतकऱयांमध्ये समाधान असले तरी पेरण्या थांबल्या आहेत.
तासगाव तालुक्यात गेल्या आठ दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने शेतात पाणीच पाणी केले आहे. अनेक ठिकाणी ओढे व नद्यांना पाणी आले आहे. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. हा पाऊस अतिवृष्टीप्रमाणे दीड ते पावणेदोन तास बेफाम कोसळला. तासगाव तालुक्यातील वायफळे, बिरणवाडी, यमगरवाडी, मांजर्डे, कौलगे, खुसगाव, लोढे, चिंचणी, वाघापूर, सावर्डे, मणेराजुरी या गावात मोठय़ा प्रमाणात अतिवृष्टी झाली.
या पावसाने तासगाव-सावळज रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. खुसगाव येथे रस्त्यावर तीन फूट पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली. तर खुसगावच्या बसस्थानकात तीन फूट पाणी होते. लोढेनजीक ओढय़ावर पाणी आल्याने दुचाकी वाहतूक बंद होती. पूर्व भागातील अनेक पुलांवर पाणी आल्याने रस्ते बंद होते. या पावसाने नुकसानीचे वृत्त नसून, रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता.