
सामना प्रतिनिधी । पणजी
गेले दोन दिवस मुंबईसह राज्यभरात धुमाकूळ घातलेल्या पावसाने गोव्यालाही चांगलेच झोडपले. राज्यात पडलेल्या मुसळधार पावसाने तेथील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासांत जास्तीत जास्त 6 इंच तर काही ठिकाणी अडीच ते 3 इंच पाऊस पडला. येत्या 24 तासांत गोव्यात अनेक भागांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला. दरम्यान, गोव्यात अंजुणे धरणातून मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला तर डिचोलीतील वाळवंटी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला.
पणजीत सर्वाधिक पावसाची नोंद
यंदाचा पाऊस विक्रमी ठरला. गेल्या 24 तासांत पणजीत तब्बल साडेचार इंच पाऊस झाला. यंदाच्या मोसमात पणजीत सर्वाधिक 2230 मिमी इतका पाऊस पडला. मांडवी नदीत भरतीच्या वेळी पाण्याची पातळी वाढल्याने रायबंदरसारख्या ठिकाणी मांडवीचे पाणी महामार्गापर्यंत पोहचले. शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. डिचोलीतील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने आणि अंजुणे धरणातून पाण्याचा विसर्ग मोठय़ा प्रमाणावर झाल्याने साखळी आणि डिचोली या ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. गोव्यात वाळपई येथे 6 इंच, पणजीत 2 इंच तर काणकोण येथे 0.75 इंच इतक्या पावसाची नोंद झाली. मधलावाडा-सावईवेरे येथील गोशाळेवर वृक्ष कोसळल्याने छप्पर आणि भिंतीखाली सापडून चार गुरांचा मृत्यू झाला. दरम्यान, अनेक भागांत झाडे उन्मळून पडल्याच्या अनेक तक्रारी आल्या.
























































