
जालना जिल्ह्याला सोमवारी रात्री झालेल्या पावसाने झोडपून काढले असून पुन्हा 9 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. जालना तालुक्यातील जालना मंडळ 80 मि.मी., पाचनवडगाव मंडळ 68 मि.मी., तर बदनापूर तालुक्यातील रोषणगाव मंडळात 70 मि.मी. पाऊस पडला. अंबड तालुक्यातील 7 मंडळापैकी सहा मंडळात अतिवृष्टी झाली असून यामध्ये अंबडमध्ये 100 मि.मी., धनगरपिंप्री 140 मि.मी., जामखेड 103 मि.मी.,वडीगोद्री 64 मि.मी., रोहिलागड 88 मि.मी, सुखापुरी 82 मि.मी. पाऊस झाला.
जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस पडला असून यामुळे नदी-नाले भरुन वाहत आहेत. सखल भागात पाणी तुंबले असून काही ठिकाणी पिकांसह शेतजमिनीचेही नुकसान झाले आहे. दुधना, लहुकी या नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. रोषणगाव व रोहिलागड या मंडळात तिसऱ्यांदा तर सुखापुरी, जामखेड येथे दोन वेळा अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सरासरी 33.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जालन्यामध्ये 42.88,बदनापूर-33.60, भोकरदन- 10.88,जाफराबाद-26.80, परतूर- 20.00, मंठा- 10.75, अंबड- 89.14, घनसावंगी- 34.71 पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 261.07 मि.मी. एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.
































































